स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींच्या हौतात्म्याला विनम्र अभिवादन
★ आज आपण ज्या स्वतंत्र भारतात श्वास घेतो आहोत, त्यामागे लक्षावधी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे, त्याग तपस्येची गाथा आहे. भर तारुण्यात स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणाऱ्या वीरांचे योगदान आहे. अगणित महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला अविरत संघर्ष आहे.
★ हजारो वर्षांच्या या आपल्या दैदिप्यमान इतिहासात आपण अनेक चढउतार ऐकले असतील, वाचले असतील. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची जेव्हा चर्चा होते तेव्हा या महत्वपूर्ण आठवणींचा आपण जरूर उल्लेख करतो. मात्र स्वातंत्र्याच्या लढयात वनात राहणाऱ्या जनजातींचेही मोठे योगदान होते, ते आपल्याला विसरता कामा नये. १८५७ पासून ते स्वातंत्र्याच्या लढाईपर्यंत त्यांनी आपला सक्रिय सहभाग घेऊन वेळप्रसंगी आपल्या प्राणाची आहुतीही दिली आहे. जनजातींनीही गुलामगिरीविरुध्द लढा काय असतो हे आपल्या बलिदानातून वेळोवेळी दाखवून दिले आहे, याविषयीही चिंतन होणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने आज २५सप्टेंबर अर्थात #हुतात्मानाग्याकातकरी स्मृतिदिनानिमित्त उरण तालुक्यातील चिरनेर येथे १९३०साली झालेल्या #जंगलसत्याग्रह मध्ये हुतात्मा नाग्या कातकरीच्या नेतृत्वाखाली झालेल्या लढयाबद्दल जाणून घेऊया…
★ जुलमी इंग्रज सरकारच्या कार्यकाळात जनजाती समाजातील शूरवीर, पराक्रमी, लढवय्ये राजे आपापली राज्ये अथक प्रयासाने पण शर्थीने सांभाळत होते. इंग्रजांचे वर्चस्व झुगारून ते मोठ्या प्रमाणावर संघर्ष करीत होते. याच काळात हुतात्मा नाग्या कातकरी याचे नाव विशेष गाजले. उरण जवळच्या चिरनेर गावी झालेल्या जंगल सत्याग्रहात नाग्या कातकरीचे हौतात्म्य ऐतिहासिक ठरले होते.
★ इंग्रज सरकारने १९३० च्या दरम्यान जनजातींचा जंगलावरील हक्क नाकारला होता. जंगलातून लाकूड, गवत गोळा करणे, फळे व वनौषधी गोळा करण्यावरही निर्बंध लादले. गाई-म्हशींनाही जंगलात सोडण्यास मज्जाव करण्यात आला. या अन्यायाविरोधात देशभर आंदोलन सुरू झाले. त्यातीलच एक आंदोलन म्हणजे चिरनेर मधील अक्काबाईच्या जंगलातील आंदोलन. खैराच्या झाडापासून कात काढणारे आम्ही कातकरी असलो तरीही आम्ही कातकरी जंगलाचे राजे आहोत, #श्रीरामाच्या #वानरसेनेचे वंशज आहोत, असे कातकरी अभिमानाने सांगत. त्या काळात गरीब जनजातीचे सऱ्हास शोषण होत असे. जंगलाचे मक्तेदार त्यांना लुबाडत होते. गांधींजींच्या सविनय सत्याग्रहाने चिरनेर जंगल सत्याग्रहासाठी जनजातीचे जागरण केले. त्यांचा म्होरक्या नाग्या कातकरी झाला. नाग्याचे जंगलाशी अगदी लहानपणापासून जिव्हाळ्याचे नाते जोडले गेले होते. ही जंगलसंपत्ती सरकारी कायद्याने आणि जंगल मक्तेदारांच्या अरेरावीने कातकऱ्यांच्या वाट्याला येत नव्हती.
★ #कातकरी समाजाला या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी कातकरी टोळ्या गोळा केल्या. त्यांची एक संघटना तयार केली. त्यांचे नेतृत्व या कोवळ्या वयातील विशीतील नाग्याकडे होते. त्याने सत्याग्रहात उडी घेतली. चिरनेरच्या जंगलात #कोयते_कुऱ्हाडी घेऊन कातकरी त्या सत्याग्रहात सहभागी झाले. या सत्याग्रहात ५,००० #जनजातीसमाज गोळा झाला होता. जंगलापासून दूर राहणं या जाणिवेने सत्याग्रहात उतरलेल्यांचे बळ अधिक वाढले होते. कारण जंगलाशिवाय राहणे, हा विचारच ते करू शकत नव्हते. नाग्याच्या विशेष शेलकीत त्याने डोंगरावरच्या सर्वात उंच झाडाच्या शेंड्यावर #तिरंगाझेंडा बांधला होता. नाग्याच्या पराक्रमाची जणू पताकाच तो झेंडा फडकावीत होता. तेव्हापासून उंच झाडाला झेंडा बांधूनच कातकरी संघर्षाला तोंड देत असत. त्याठिकाणी अक्काबाईचे जंगल होते. त्या अक्काबाईच्या जंगलात पोलिसांचा स्वैर #गोळीबार झाला. लोक सैरभैर झाले, पांगले. त्या गर्दीत नाग्याच्या मांडीत आरपार गोळी घुसली. नाग्याला शेवटी झोळीत घालून त्याच्या वडिलांनी कातकरी वाडीत नेले. जखमी #नाग्याकातकरी शेवटी एकाकी झाला. त्याला रुग्णालयाचे उपचार मिळाले नाहीत. तो केवळ घरगुती उपचारावर होता. गावठी औषधांवर राहून तो आपल्या जखमेवरचा घाव भरत होता. ठकी नावाची त्याची बहीण त्याची देखभाल करत होती. पण १९१०साली जन्मलेला नाग्या ऐन तारुण्यात चिरनेरच्या सत्याग्रहात हुतात्मा झाला.
★ #स्वातंत्र्यसंग्रामातील जनजातींच्या चळवळींचा इतिहास वाचला तर तो आपल्याला पार चौदाव्या शतकापर्यंत घेऊन जातो. वेळोवेळी महंमद तुघलक, बिदरचा राजा, बहामनी सरदार यांच्याविरुद्ध एकजूट करून जनजातींनी आपल्या ताब्यात असलेल्या जमिनी, #किल्ले यांचे रक्षण केले होते. इंग्रजांच्या काळातही त्यांना अनेक वेळा लढावे लागले. त्या काळात #इंग्रज अधिकाऱ्यांना जनजातींच्या जमिनी हडप करण्यासाठी स्थानिक जमीनदार आणि धनिक मदत करीत. १७८८ ते १७९५ या काळात छोटा नागपूर येथे #तमाड जमातीने, १८१२ मध्ये राजस्थानात #भिल्ल जमातीने, तसेच १८१८ ते १८३० ईशान्यपूर्व भारतात #नागा, #मिझो, लुशाई, मिशिपी, दफम्त इत्यादी जमातींनी, बिहारमध्ये #मुंडा, कोल, खैरनार जमातींनी, १८३२मध्ये #संथालांनी इंग्रजांच्या कारवायांना कडाडून विरोध केला. इंग्रजांच्या निर्दयतेने शेतसारा वसूल करण्याच्या पद्धतीला #बिरसामुंडा याने जनजातींना ‘शेतीत पेरणीच करू नका’ असे सांगून अभिनव पद्धतीने विरोध नोंदवला होता.
★ महाराष्ट्रातही जनजाती चळवळ पहिल्यापासूनच प्रभावी होती, याचे कारण नैसर्गिकपणे त्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनी, किल्ले आणि निसर्गसंपत्तीने संपृक्त जंगले यावर नेहमीच त्या-त्या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांचा डोळा असे. जंगलातील कच्चा माल इंग्रज बाहेर नेत असत. त्यापासून स्वत:चे रक्षण करताना या सर्व जमाती #लढाऊ बनल्या. त्यातही जनजाती स्त्रियांचा लढाऊपणा काही औरच होता. अगदी इंग्रजांच्या काळातही दाशरीबेन चौधरी, झलकारी, #राणीदुर्गावती, #राणीगायदिनलु, #सुदेशा अशा स्त्रियांनी स्वातंत्र्यलढय़ातील आपला वाटा उचलला होता.
★ आज हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतिदिनानिमित्त या सगळ्यांच्या बलिदानाचे स्मरण कायमस्वरूपी महत्वाचे ठरेल.
लेखिका-शुभदा अभ्यंकर
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे