नवी दिल्ली, २६ सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी १००व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांचे स्मरण केले.
पंतप्रधान मोदींनी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांच्यासोबत काढलेली काही छायाचित्रे X या समाजमाध्यमावर अपलोड करत त्यांच्या आठवणी जागविल्या आहेत. “देव आनंदजी सदाबहार प्रतीक म्हणून स्मरणात आहेत. कथाकथनाची त्यांची आवड आणि सिनेमाची आवड अतुलनीय होती. त्यांच्या चित्रपटांनी केवळ मनोरंजनच केले नाही तर भारताच्या बदलत्या समाजाचे आणि आकांक्षांचे प्रतिबिंबही दिले. त्याच्या कालातीत कामगिरीने पिढ्यांवर प्रभाव टाकला आहे. त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण.” अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
देव आनंद यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ रोजी झाला आणि ते बॉलिवूड चित्रपटसृष्टितील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. सुमारे सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘गाईड’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘ज्वेल थीफ’ आणि ‘सीआयडी’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या भूमिकांद्वारे ठसा उमटवला. ‘जाल’मध्ये स्मगलर, ‘दुश्मन’मध्ये फरार टोळीचा सदस्य, ‘कालाबाजार’मध्ये काळाबाजार करणारा आणि ‘बॉम्बे का बाबू’मध्ये खुनीची भूमिका करत त्यांनी आपल्या अभिनयाचे नवे पैलू रसिकांसमोर आणले. एक अभिनेता असण्यासोबतच, ते एक लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते देखील होते. २००१ साली भारत सरकारने तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण किताबाने त्यांचा गौरव केला होता. ३ डिसेंबर २०११ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी लंडनमधील वॉशिंग्टन मेफेअर हॉटेलमधील त्यांच्या खोलीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.