गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी २ ऑक्टोबर १८६९ त्या बालकाचा जन्म झाला. अर्थातच कृष्णाचे नाव ठेवले मोहन. लहानपणी इतर मुलांप्रमाणेच हुड असणाऱ्या मोहनला वडिलांनी राजा हरिश्चंद्र आणि पितृभक्तीवरील इतर काही नाटकांची पुस्तके वाचायला दिली. त्या पुस्तकांचा बालमनावर मनावर खूप चांगला परिणाम झाला आणि पुढील आयुष्यात हरिश्चंद्राप्रमाणे सत्यवादी होण्याचे त्यानी ठरवले.
त्या वेळच्या पद्धतीनुसार वयाच्या १३ व्या वर्षीच विवाहबद्ध झालेल्या मोहनदासांचे पितृछत्र मात्र हरपले.त्यानंतर त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना बॅरिस्टरची पदवी मिळवण्यासाठी इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले. अमली पदार्थांचे सेवन, अभक्ष भक्षण न करण्याची व परस्त्रीला स्पर्श न करण्याची शपथ घेतल्यानंतरच त्यांच्या आईने त्यांना जाण्याची परवानगी दिली.
१८९१ साली बॅरिस्टरची पदवी घेऊन ते भारतात आले व मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यांना फारसे यश मिळाले नाही.त्याकाळी भारतावर इंग्रजांचे शासन होते, गौरवर्णीयांप्रमाणेच कृष्णवर्णीयांना वागणूक मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सत्याग्रह, सविनय कायदेभंग, असहकार, शस्त्रांशिवाय प्रतिकार या साधनांचा त्यांनी वापर केला
हिंसेपेक्षा अहिंसेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, यावर त्यांचा विश्वास होता. सर्वांच्या कल्याणातच आपले कल्याण आहे याची त्यांना जाणीव झाली त्यांनी बौद्धिक शिक्षणापेक्षा हृदयाच्या शिक्षणाला, चारित्र्याच्या विकासाला प्रथम स्थान दिले.
जातीभेद त्यांना कदापी मान्य नव्हता. अस्पृश्यांना त्यांनी हरिजन असे नाव दिले. गीतेतील कर्मयोग त्यांनी आपल्या आचरणात आणला. लोकांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली. राष्ट्रपिता या पदवीने त्यांना सन्मानित केले.
१९४२ साली भारत छोडो आंदोलन , चले जावो, भारत छोड़ो, करो या मरो असे नारे त्यांनी दिले. २ ऑक्टोबर हा दिवस त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
तसेच माननीय पंतप्रधानांनी हा दिवस आता स्वच्छता दिन म्हणून घोषित केला आहे.आपला परिसर स्वच्छ ठेऊन सार्वजनिक स्वच्छता पळून राष्ट्रपित्याला आदरांजली वाहू या
वृषाली कुलकर्णी, कोपरगाव जिल्हा नगर