(जन्म – २ ऑक्टोबर १९०४ मुगलसराय येथे आणि मृत्यू – ११ जानेवारी १९६६ ताश्कंद येथे)
भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न मा. श्री. लाल बहादूर शास्त्री ह्यांची आज जयंती !
भारतीय राजकारणात ज्यांना मानाचा मुजरा करावा असे थोर देशभक्त म्हणजे लालबहादूर शास्त्री. काशी विद्यापीठातून त्यांना शास्त्री ही पदवी मिळाली. देशसेवेच्या तीव्र ओढीने लाला लजपतराय यांच्या लोकसेवेत समाजाचे जे सदस्य झाले. तेथे त्यांनी मनापासून कार्य केले. स्वातंत्र्यचळवळीतून त्यांना अनेक वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यातूनच त्यांची पं. नेहरूंशी ओळख झाली. तुरुंगवासात त्यांनी वाचन, मनन, लेखन करण्यात वेळ घालवला.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ सालच्या निवडणुकीत लालबहादूर लोकसभेत निवडून आले, व पंडित नेहरूंचा मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री झाले. शास्त्रीजींचा कारभार रोख असे. एका रेल्वे अपघातामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. पुढील निवडणुकीत व्यापार आणि उद्योग मंत्री झाले. १९६१ साली गृहमंत्री झाले. व नेहरूंच्या निधनांनंतर ९ जून १९६४ पासून भारताचे पंत्रप्रधान झाले. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यामुळे त्यांनी जवानांना हिरवा कंदील दाखवला. पाकिस्तानला भारतीय फौजांनी त्यांना जागा दाखवून दिली जवानांनी यशस्वी कामगिरी केली! स्वातंत्र्याचे रक्षण आणि लोकांचे पोषण यांचे अजोड रहस्य पटविण्यासाठी ‘जय जवान जय किसान’ हा मंत्र शास्त्रीजींनी राष्ट्राला दिला. त्यांच्या कार्याच्या अजोड प्रतिमेमुळेच राष्ट्रपतींनी त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब बहाल केला.
लालबहादुर शास्त्री म्हणजे साधेपणा आणि महानतेची प्रतिकृती होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत. ते देशाचे पंतप्रधान असतानाची गोष्ट आहे. एका दिवशी ते कापड गिरणी पाहण्यासाठी गेले. त्यांच्याबरोबर गिरणीचा मालक, उच्च अधिकारी व इतर महत्त्वाचे लोक होते. गिरणी पाहिल्यानंतर शास्त्रीजी गिरणीच्या गुदामात गेल्यानंतर त्यांनी साड्या दाखवायला सांगितले. गिरणी मालक आणि अधिकार्याने एकापेक्षा एक सुंदर साड्या त्यांना दाखवल्या. शास्त्रीजी साड्या पाहून म्हणाले,’ साड्या तर खूप सुंदर आहेत, यांची किंमत काय आहे?’
‘ ही साडी ८०० रूपयांची आहे आणि हिची किंमत एक हजार रुपये आहे,’ गिरणी मालकाने सांगितले. ही तर खूप महाग आहे, मला कमी किमतीच्या साड्या दाखवा, शास्त्रीजी म्हणाले. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट होती की ही घटना १९६५ ची होती, यावेळी एक हजार रुपयांची किंमत खूप होती.
‘बरं, ही पाहा. ही साडी पाचशे रुपयांची आहे आणि ही चारशे रुपयांची,’ गिरणी मालक दुसर्या साड्या दाखवत म्हणाला. ‘अरे बाबा, यादेखिल खूप महाग आहेत. माझ्या सारख्या गरीबासाठी कमी किमतीच्या साड्या दाखवा, ज्या मी खरेदी करू शकेल,’ शास्त्रीजी म्हणाले. ‘ वा सरकार, आपण तर आमचे पंतप्रधान आहात, तुम्हाला गरीब कसे म्हणता येईल? आम्ही तर या साड्या तुम्हाला भेट देत आहोत,’ गिरणी मालक बोलला.
‘ नाही बाबा, मी भेट घेऊ शकत नाही’, शास्त्रीजी म्हणाले. यावर तो गिरणी मालक अधिकाराने म्हणाला की, ‘आम्ही आमच्या पंतप्रधानांना भेट देणे, हा आमचा अधिकार आहे.’
‘ हो, मी पंतप्रधान आहे,’ शास्त्रीजी शांतपणे म्हणाले.’ परंतु, याचा अर्थ असा नाही की ज्या वस्तू मी खरेदी करू शकत नाही त्या वस्तू मी भेट म्हणून स्वीकारू आणि आपल्या पत्नीला देऊ. बाबा, मी पंतप्रधान असलो तरी आहे गरीबच ना. तुम्ही मला स्वस्त साड्याच दाखवा. मी ऐपतीप्रमाणेच साडी खरेदी करेन.’गिरणी मालकाच्या सार्या विनवण्या व्यर्थ गेल्या. देशाच्या पंतप्रधानांनी स्वस्त भावाच्या साड्याच खरेदी केल्या. शास्त्रीजी एवढे महान होते की मोह त्यांना स्पर्शही करू शकत नव्हता.
काश्मीरमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाला असताना पं. नेहरूंनी शास्त्रींना तेथे तातडीने पाठविले होते. श्रीनगर येथे गोठवणारी थंडी असल्याने पं. नेहरूंनी स्वत:चा ओव्हरकोट शास्त्रींना दिला. जणू पुढील जबाबदारी शास्त्रींच्या खांद्यावर येणार याचेच ते सूचक होते ! पंतप्रधान म्हणून शास्त्रींनी आपला स्वतंत्र, तेजस्वी ठसा उमटवला. १९६२ च्या चीन युद्धातील मानहानिकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर,१९६५ च्या भारत-पाक युद्धात शास्त्रींनी देशास खंबीर व यशस्वी नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा झळाळून निघाली. ‘जय जवान, जय किसान’ च्या मंत्राने सारा देश भारावून गेला. ताश्कंद शिखर परिषदेत मुत्सद्देगिरीने पावले टाकून त्यांनी अखेर अयुब खानना झुकविले. शास्त्रींनी यशाचे अत्युच्च शिखर गाठले, पण आकस्मिक त्यांचे अवतारकार्य संपुष्टात आले !
मृत्यूविषयी प्रवाद –
शास्त्रींवर विषप्रयोग झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी सातत्याने केला. मृत्यूनंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते हा त्यांच्यावरील विषप्रयोगाचा पुरावाच असल्याचे अनेकांचे मत आहे. शास्त्रींच्या रशियन स्वयंपाक्याला त्यांच्यावर विषप्रयोग केल्याच्या आरोपावरून अटकही करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. इ.स. २००९ साली अरूण धर यांनी माहितीहक्काच्या कायद्यानुसार पंतप्रधान कार्यालयाकडे शास्त्रींच्या मृत्यूचे कारण जाहीर करण्याची विनंती केली. पण पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती फेटाळून लावली. त्यासाठी कारण देताना यामुळे आपले इतर देशांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता, देशात हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता आणि संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होऊ शकतो असे नमूद करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने शास्त्रींच्या मृत्यूबाबत एक दस्ताऐवज आपल्याकडे असल्याचा दावा केला, मात्र तो उघड करण्यास नकारही दिला. तसेच त्यावेळच्या सोवियत रशियाने शास्त्रींचे पोस्टमॉर्टेम न केल्याचे मान्य केले. पण, शास्त्रींचे वैयक्तिक डॉक्टर आर. एन. चुग आणि काही रशियन डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचा अहवाल आपल्याजवळ असल्याचे मान्य केले. आपल्याकडील कोणताही दस्तऐवज नष्ट केलेला नाही वा गहाळ झालेला नाही हेसुद्धा पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले. मात्र भारताने त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम केले वा नाही, तसेच शास्त्रींच्या मृत्यूबाबत कोणतीही दुर्घटना घडवून आणण्यात आली होती वा कसे याबाबत अजून तरी सबळ खुलासा झालेला नाही.
संकलन – प्रसन्न खरे
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे