विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणचे स्वामी रामानंद तीर्थ ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर, हे एक संन्यासी वृत्तीचे पण हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. सोलापूरात सरकारी शाळेत शिक्षण घेऊन ,उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा रवा या गावी गुरुकुलात कार्यरत असणाऱ्या रामानंदानी इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांच्याकडून दीक्षा घेतली.
त्यादरम्यान हैदराबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रझाकार’ या संघटनेने मराठवाड्यातील| जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले त्यात त्यांना अटक झाली , ते सुमारे चार महिने कारावासात होते. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले.
‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत.
माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले.
लोकसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकांत गुलबर्गा व औरंगाबाद येथून रामानंद तीर्थ हे निवडून गेले होते. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले.१९७२ साली त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले.
स्मिता कुलकर्णी
कोपरगाव ,जिल्हा नगर
सौजन्य – समिती संवाद , पश्चिम महाराष्ट्र