११ नोव्हेंबर १६७५ ला औरंगजेबाच्या अधिपत्याखाली आणखी एक निर्घृण हत्याकांड घडवून आणले गेले. हिंदूंसाठी लढणारे शिखांचे नववे गुरू , गुरू तेगबहादुर यांची हत्या झाली.त्यावेळी त्यांचा मुलगा गोविंदसिंग फक्त ९ वर्षाचा होता.आई गुजरी आणि वडील तेगबहादुर यांचा हा मुलगा लहानपणी ‘गोविंदराय’ या नावाने ओळखला जात असे.
गुरू तेगबहादुर यांच्या वधानंतर वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी गोविंदसिंग गादीवर आले. आपल्या प्रभावी नेतृत्वाने त्यांनी शीख समाज सुसंघटित केला आणि शिखांमध्ये राजकीय जागृती निर्माण केली. ‘खंडेदाअमृत’ नावाचा एक शिख दिक्षाविधीही त्यांनी सुरू केला. दिक्षेनंतर त्यांचे अनुयायी आपल्या नावापुढे ‘सिंग’ ही उपाधी लावू लागले.
‘पंच ककार’ म्हणजे केस, कंगवा, कच्छ, कडे आणि कृपाण धारण करू लागले. त्यांच्या अनुयायांना ‘खालसा’ म्हणजे अत्यंत शुद्ध अशा अर्थाने संबोधले जाते. खालसा पंथाचे ते संस्थापक आहेत.
आपल्या धार्मिक शिकवणुकीत त्यांनी एकेश्वरवादी मताचा पुरस्कार केला. शौर्य व राष्ट्रभक्ती या गुणांना त्यांनी आपल्या शिकवणुकीत अग्रस्थान दिले. आपल्या अनुयायांना लष्करी शिक्षण देऊन त्यांची एक शिस्तबद्ध फौज त्यांनी तयार केली व औरंगजेबाविरुद्धच्या अनेक लढायांत विजय मिळविले.
गुरू गोविंद सिंग एक सिद्धहस्त लेखक होते. संस्कृतसह फार्सी, पंजाबी, व्रज अशा अनेक भाषांचे जाणकार होते. ,त्यांनी स्वतः अनेक ग्रंथ रचले. ते विद्वानांचे आश्रयदाते होते. गोविंदसिंगांनी विपुल ग्रंथरचनाही केली आहे.त्यांची भाषाशैली ओजस्वी असून आपल्या काव्यात त्यांनी विविध छंदांचा उपयोग केला आहे.
विद्यासागर, गोविंद गीता, चांदी-दी वार हे त्यांचे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत.
आपल्यानंतर शिखांचा पवित्र धर्मग्रंथ ग्रंथसाहिब यासच गुरुस्थानी मानावे, असा आदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला.
औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याच्या मुलांत दिल्लीच्या तख्ताबद्दल चाललेल्या तंट्यात गोविंदसिंगानी औरंगजेबाचा ज्येष्ठ पुत्र बहादुरशाह याची बाजू उचलून धरली व त्यास तख्तावर येण्यास मदत केली. बहादुरशाहाचा धाकटा भाऊ कामबख्श याचे बंड मोडून काढण्यासाठी गोविंदसिंग बहादुरशाहाबरोबर दक्षिणेस गेले असताना, नांदेड मुक्कामी एका पठाणाने अचानक हल्ला करून गोविंदसिंगाचा वध केला.
अजितसिंग,जुझारसिंग, जोरावरसिंग व फतहसिंग ही त्यांची चारही मुले पुढे लढायांत मारली गेली.
नांदेड येथे त्यांची समाधी असून ते शिखांचे एक महत्त्वाचे धर्मक्षेत्र मानले जाते.
मनिषा बारबिंड, कोपरगाव
सौजन्य – समिति संवाद ,पश्चिम महाराष्ट्र प्रांत