राजास जी महाली
सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली
या झोपडीत माझ्या
शालेय वयात शिकलेली ही कविता आठवत नाही अशी व्यक्ती विरळाच !
त्या वयात त्या काव्यातला गर्भितार्थ कदाचित तितका कळला नसेलही पण तरी ते अर्थपूर्ण शब्द हृदयाच्या कप्प्यात जाऊन बसले..
अमरावती जिल्ह्यातल्या यावली या छोट्या खेड्यात जन्माला आलेल्या माणिक बंडोजी इंगळे या बालकाला शाळा म्हटलं तर नावच नको काढायला!!
पण तरी परीक्षेत मात्र नेहेमी पास!!
लहानपणी पोहणे, घोड्यावरून रपेट मारणे, कुस्त्या खेळणे असे निर्भयी खेळ तो खेळत असे.
चौथीपर्यंत शिक्षण झाले आणि त्यांनी शाळा सोडली!! आईबरोबर घर सोडून मामाकडे वरखेड गावी राहावे लागले. दरम्यान नाथपंथीय संत अकडोजी महाराज यांची या बालकाशी भेट झाली
आणि हा छोटा मुलगा गुरु सानिध्यात वेळ घालवू लागला त्यांच्याकडून आत्मज्ञान अध्यात्म जाणून घेऊ लागला…
गुरुजींनी त्यांचे माणिक नाव बदलून तुकडोजी ठेवले.
आणि ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले.
वाक्यरचना अक्षर जुळवणी या मध्ये तुकडोजींचा हात धरणारे कोणीही नव्हते!!
प्रतिभा संपन्न असे ते कवी होते!!
असंख्य भजने अभंग तुकडोजींनी रचले .अर्थपूर्ण रसभरीत वर्णन सद्गुणांचा उपदेश ,सामाजिक जागृती, राष्ट्र उन्नती ,सर्वधर्मसमभाव असे विषय घेऊन त्यांनी प्रवचनातून लोकांना समजेल अशा भाषेतून प्रखर विचार मांडले .
ग्रामगीतेमध्ये त्यांनी आत्मसंयमन कसे करावे हे सांगितले .
खंजिरी भजन प्रकार हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
राष्ट्रसेवा स्वधर्म पालन याविषयी देशभर फिरून प्रबोधन केलेच पण जपान सारख्या देशात जाऊन त्यांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.
१९४२च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना अटकही झाली होती .”आते है नाथ हमारे “हे त्यांनी गायलेले पद स्वातंत्र्यलढायसाठी स्फूर्ती गान ठरले होते.
ग्रामविकास म्हणजेच देशाचा विकास असे त्यांनी ठासून सांगितले.
गाव स्वयंपूर्ण व्हावे सुसंस्कृत व्हावे गावानेच देशाच्या गरजा भागवाव्या असा त्यांचा प्रयत्न होता.
कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था तुकडोजींसारख्या महान प्रबोधनकारांचा या देशाच्या उन्नतीमध्ये मोलाचा वाटा आहे,
विश्वधर्म परिषद व विश्वशांतीसाठी ते सयाम, ब्रह्मदेश व जपान येथे गेले होते.
– तेथेही त्यांनी खंजिरी भजनातून सर्वांचा देव एकच आहे हे सांगितले.
– हर देश में तू, हर भेष में तू । तेरे नाम अनेक तू एकही है ।। असे त्यांचे कित्येक भजनं लोकप्रिय आहेत.
तत्कालिन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी दिली होती. या राष्ट्रसंताला कोटी कोटी प्रणाम
स्वाती मुळे कोपरगाव.
सौजन्य- समिति संवाद,पश्चिम महाराष्ट्र प्रांत