शिवसेना अपात्र आमदार प्रकरणात सोमवारपर्यंत वेळापत्रक सादर करावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. या प्रकरणी पुढच्या निवडणूकापर्यंत तरी निर्णय घ्या. राष्ट्रवादी आमदार प्रकरणात मंगळवारपर्यंत वेळापत्रक द्यावे असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. विधानसभा अध्यक्ष पद घटनात्मक असले तरी आम्ही आदेश देऊ शकतो असेही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज विधानसभा अध्यक्षांच्या आमदार अपात्रता सुनावणीतील दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी किमान दोन महिन्यात निर्णय घेणं आवश्यक असल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे. तसेच, विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, असंही सरन्यायाधीश म्हणाले आहेत. पोरखेळ करताय का? असं म्हणत सरन्यायाधीशांनी अत्यंत कडक शब्दांत राहुल नार्वेकरांना सुनावले आहे.
सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे न्यायाधीश सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनाही स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.दरम्यान अपात्रता प्रकरणावरील सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठरवलेल्या वेळापत्रकावरही सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले आहेत. कायदा तुम्हाला बसवून शिकवावा लागेल, असे ही सरन्यायाधीश सुनावणीदरम्यान म्हणाले आहेत.