नीलांबर मुखर्जी यांच्या आश्रमात त्यादिवशी विशेष गडबड होती. स्वामींची एक शिष्या ब्रह्मचारिणी व्रताची दिक्षा घेणार होती.
घंटानाद, शंखनाद, झांजा चिपळ्या यांच्या निनादात जुने सर्व संपवून नव्या जीवन ध्येयासाठी ती शिष्या अगदी तयार होती.
गुरुचरणी सर्व निवेदित केलेल्या आपल्या शिष्येला स्वामींनी हाक मारली
‘निवेदिता ! ‘
‘निवेदिता !!’
आणि आयर्लंडच्या मार्गारेट नोबलला भारतीयांनी निवेदिता म्हणून आपलेसे केले !!
जन्मतः प्रतिभावान असलेल्या या मुलीला आईवडिलांचा सहवास फारसा मिळालाच नाही. वडीलांच्या मृत्यू नंतर लंडनला आलेल्या १७ वर्षीय मार्गारेटने विवेकानंदांचे विचार ऐकले.तिच्या पाश्चात्य ज्ञानाला हे सगळे नवीन होते.
स्वामीजींची भाषणे ऐकून, त्यांच्याशी अनेक विषयावर चर्चा करून मनाची खात्री पटल्यावर पूर्ण विचारांती वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्या भारतात आल्या.
त्याकाळी इथल्या समाजात असलेल्या जाचक रूढी, सोवळे ओवळे या संकल्पना बाजूला सारून भारतीय म्हणून इथल्या समाजाने त्यांचा स्वीकार करावा ही मार्गारेट यांच्यासाठी सुद्धा एक मोठी तपश्चर्याच होती.
स्वामीजी खेड्यापाड्यातून हिंडताना या आपल्या शिष्येला बरोबर नेत असत.
त्यातून निवेदितांची मानसिक जडण – घडण होत होती. जन्मापासूनचे इंग्रजी संस्कार पुसले जाऊन नवीन संस्कार रुजायला सुरुवात झाली होती.
आणि मग….
प्लेगच्या साथीत एकीकडे स्वतः हातात झाडू घेणारी तर दुसरीकडे वेदांतावरही चर्चा करणारी ‘ कर्मयोगिनी ‘ भारतीय समाजाने बघितली
बाघ बाजारातल्या आपल्या छोट्या घरात मुलींच्या शाळेसाठी जागा राखीव ठेवणाऱ्या निवेदितांनी, त्यावेळी काश्मीर नारेशांनी दिलेल्या ८०० रुपयांच्या देणगीतून ‘बालिका विद्यालय ‘ सुरू केले.
क्रांतिकारकांना अनेक प्रकारे मदत करणाऱ्या निवेदितांनी आपल्या लेखणीने आणि वक्तृत्वाने भारतीय तरुणांना स्वातंत्र्याप्रती खडबडून जागे करण्याचे कर्तव्य अगदी यथायोग्य पार पाडले होते.
जमशेटजी टाटांना भेटून इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स या संस्थेच्या स्थापनेचे यशस्वी प्रयत्न केले.
विविध विषयात विविधांगी प्रयत्न करणाऱ्या या स्वामीशिष्येने १३ ऑक्टोबर १९११ रोजी जगाचा निरोप घेतला
भाग्यश्री बडदे
कोपरगाव
सौजन्य – समिति संवाद , पश्चिम महाराष्ट्र प्रांत