डॉ. अर्चना श्रीवास्तव यांच्या कलाकृतीत जीवनाचे तत्त्वज्ञान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारताला सांस्कृतिक आणि अध्यात्माची महान परंपरा लाभली आहे. चित्रकार डॉ. अर्चना श्रीवास्तव यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून जीवनाचे तत्वज्ञान पाहावयास मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
प्रसिद्ध चित्रकार डॉ. अर्चना श्रीवास्तव यांनी ‘आध्यात्मिक प्रतिबिंब’ या विषयावर जहांगीर कला दालनात भरविलेल्या चित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज सायंकाळी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. श्रीवास्तव ह्या माजी मुख्य सचिव तथा राज्यसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांच्या पत्नी आहेत. उद्घाटन सोहळ्याला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव डॉ . श्रीकर परदेशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशाला लाभलेल्या सांस्कृतिक आणि अध्यात्माच्या वारश्याचे संवर्धन करण्याचे काम डॉ. श्रीवास्तव यांच्या कलाकृतीतून होत आहे. डॉ. श्रीवास्तव यांची चित्रे महत्वपूर्ण असून त्यांच्यातून जीवनाचे तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत जाण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी चित्र प्रदर्शनाची पाहणी केली. डॉ. श्रीवास्तव यांनी चित्रांविषयीची माहिती दिली. यावेळी वरीष्ठ सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी, सांस्कृतिक, सामाजिक आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी अभिनेता जितेंद्र, राकेश रोशन, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, सुनील शेट्टी आदींनी प्रदर्शनाला भेट देत पाहणी केली.