अक्षताताई म्हणतात, तुम्ही शिकत रहा…
सोलापूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या एका चांगल्या उपक्रमाची ही ओळख आहे. अक्षताताई कासट यांचीही ओळख या कार्याच्या निमित्तानं होईल.
तुम्ही चांगलं काम करत असाल, तर तुम्हाला समाजाची नेहमीच चांगली साथ मिळते, याचा अनुभव अनेकजणींना समाजात काम करत असताना येत असतो. शालेय विद्यार्थ्यांसाठी मुख्यत्वे गरजू विद्यार्थ्यांसाठी सोलापूरमध्ये एक खूप चांगली योजना गेल्या सहा वर्षांपासून आपली एक मैत्रीण चालवत आहे. तिची कामाची तळमळ पाहून तिला या योजनेसाठी समाजाचीही चांगली साथ मिळते. सौ. अक्षताताई महेश कासट यांची ओळख सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी त्या करत असलेलं काम महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक काम अधिक चांगल्या प्रकारे करता यावं म्हणून त्यांनी मुद्दाम एमएसडब्ल्यू ही पदवी देखील संपादित केली आहे.
कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशातून ही योजना चालवली जाते. विद्यार्थी दत्तक योजना हे या योजनेचं नाव. कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये हाच निर्धार, गरजू विद्यार्थ्यांना देऊ दत्तक योजनेतून आधार, हे योजनेचं घोषवाक्य आहे. अक्षताताईंचे पती महेश हे देखील सामाजिक कार्यात सक्रिय असतात. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान या संस्थेचे ते संस्थापक आहेत. सोलापूरमधील नीलकंठ सहकारी बँकेत ते नोकरी करतात. या संस्थेतर्फे गेल्या सहा वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना चालवली जात आहे.
सोलापूरमधील अनेक वस्त्या, तसंच वसाहती अशा आहेत की ज्यातील विद्यार्थ्यांचं शिक्षण काही ना काही कारणांनी थांबू शकतं. अशा परिस्थितीत शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, या उद्देशानं ही योजना सुरू केल्याचं अक्षताताई सांगतात. संस्थेनं आतापर्यंत पावणेदोनशे विद्यार्थ्यांचं शिक्षण या उपक्रमातून पूर्ण केलं आहे. त्यासाठी त्या वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतात आणि नववी तसंच दहावीतील ज्या विद्यार्थ्यांना सहाय्याची आवश्यकता आहे, त्यांची माहिती संकलित करतात. त्यानंतर या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च संस्था करते. त्यात मुख्यत्वे त्यांना पाठयपुस्तकं, वह्या, गणवेश, परीक्षा शुल्क, दप्तर तसंच अन्य आवश्यक सर्व शालेय साहित्य देण्यात येतं.
विद्यार्थ्यांना वर्षभरात जे जे शालेय साहित्य लागतं ते देण्यासाठी एक दुकान निश्चत करण्यात येतं. त्या दुकानात जाऊन ते साहित्य विद्यार्थी त्याला दिलेलं ओळखपत्र दाखवून घेतो आणि त्याचा संपूर्ण खर्च प्रतिष्ठानच्या वतीनं केला जातो. ज्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते, त्यांना एकदाच शैक्षणिक सहाय्य केलं जातं असं नाही, तर त्यांच्याशी वर्षभर संपर्क ठेवला जातो. त्यांच्या अभ्यासाची चौकशी केली जाते. त्यांना आणखी कशाची काही आवश्यकता आहे का, हे विचारलं जातं.
ही दत्तक योजना विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाची ठरली आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेले विद्यार्थी बालरोजगारीकडे वळतात. हे प्रमाण कुठेतरी कमी व्हायला पाहिजे, हे थांबलं पाहिजे हे लक्षात घेऊन मी अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते. समाजातील दानशूरांना आम्ही आवाहन करतो की, तुम्ही एका विद्यार्थ्याचं पालकत्व घ्या. त्यानुसार दरवर्षी अनेकांकडून मोलाचं साहाय्य मिळतं. या उपक्रमातील विद्यार्थी खूप उत्साहानं अभ्यास करून चांगले गुण मिळवतात आणि त्यांचे पालकही खूप आनंदित होतात. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अनेकांचे फोनही येतात की, तुमच्या मदतीमुळे आमचा पाल्यानं खूप छान अभ्यास करून चांगलं यश मिळवलं आहे, तेव्हा खूप समाधान वाटतं, असं अक्षताताई सांगतात. संस्थेतर्फे वर्षभर अनेक कार्यक्रम, उपक्रम केले जातात. त्यातही अक्षताताई सक्रिय असतात.
चांगलं काही काम करण्यासाठी आपण पुढे झालो, तर सर्वांचीच साथ मिळते, हा अक्षताताईंचा अनुभव. चला… आपणही असंच काहीतरी छान घडवण्याचा संकल्प करू या…
सौजन्य – विश्व संवाद केंद्र