तारकाताईंचा विश्वास, सातत्य ठेवलं, तर संस्कार होतील..
कुटुंब प्रबोधन, कुटुंब मीलन किंवा संस्कार वर्ग हे उपक्रम निश्चितच चांगले आहेत आणि खूप उपयुक्त देखील आहेत. पालकांचीही साथ त्याला मिळत आहे. यापुढची गरज आहे ती असे उपक्रम सतत करत राहण्याची, असा तारकाताईंचा अनुभव आहे.
शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांवर संस्कार होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं आवश्यक आहे, असं नेहमी म्हटलं जात असलं, तरी सगळ्यांनी म्हणजे कोणी याचा नेमका विचार काही होत नाही. या प्रयत्नांना स्वतःपासूनच सुरुवात करणाऱ्या अनेकजणी आहेत. त्या चांगलं काही काम सुरू करतात आणि पाहता पाहता त्यांच्या कामाला यश देखील येतं. पुण्यात वडगाव परिसरात राहणाऱ्या तारकाताई शाळिग्राम यांची ओळख त्यासाठीच मुद्दाम करून घ्यायला हवी.
वडगाव परिसरातील मीनाक्षीपुरम या सोसायटीत तारकाताई राहतात. त्या बीएसएनएलमध्ये सातारा इथं नोकरीला होत्या. सन २०२० मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. त्या ज्या सोसायटीत राहतात ती चांगली दोनशेहून अधिक सदनिकांची सोसायटी आहे. सातारा इथं असताना तारकाताई भारतीय मजदूर संघाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. या संघटनेचं काम त्यांनी अनेक वर्ष केलं. संघटनेच्या त्या जिल्हाध्यक्षही होत्या. राष्ट्र सेविका समितीचंही काम त्या करायच्या. पुण्यात आल्यानंतर त्या कुटुंब प्रबोधन या कामाशी जोडल्या गेल्या. सामाजिक कार्याची आवड त्यांना होतीच. कुटुंब प्रबोधन या कामाची ओळख झाल्यानंतर त्यांना ते काम, तो विचार आवडला आणि ताईंनी धडाडीनं ते काम सुरू केलं.
सुरुवात अर्थातच ज्या सोसायटीत त्या राहतात, तेथून त्यांनी केली. कुटुंब प्रबोधनाच्या कार्यातील अमृत परिवार ही संकल्पना सोसायटीतील कुटुंबांशी संपर्क साधून त्यांना सांगायला ताईंनी सुरुवात केली. हळूहळू त्यासाठी नोंदणीही सुरू झाली. प्रतिसाद मिळायला लागला. कल्पना सर्वांना आवडली. कोणीतरी हे करायला पाहिजे, अशी सगळ्यांची प्रतिक्रिया होती. मग ही माहिती देण्यासाठी एक कार्यक्रमही आयोजिला गेला. त्यात कुटुंब प्रबोधन या संकल्पनेची माहिती सर्वांना दिली गेली. ताईंनी पुढाकार घेऊन पहिल्या टप्प्यात पसतीस ते चाळीस कुटुंबांची नोंदणी केली. पहिला उपक्रम अधिक मासात झाला. या महिन्यात काही ना काही दान करावं, अशी योजना करण्यात आली. त्यातून रोज एक मूठ धान्य देण्याचा उपक्रम सर्व कुटुंबांनी केला. त्यातून मोठ्या प्रमाणात धान्य संकलन झालं. ते पुण्यातील एका चांगल्या संस्थेला नेऊन देण्यात आलं.
नवरात्रोत्सवानिमित्त रोज एका देवीची कथा आणि त्याच्या जोडीला एक बोधकथा महिलांना सांगण्याचा उपक्रम तारकाताई करत आहेत. हा उपक्रमही महिलांना खूप आवडला आहे. आपण मुलांवर संस्कार करायचे, त्यांना चांगली माहिती द्यायची तर आधी ती आपल्याला व्हायला हवी. म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचं ताई सांगतात. त्यातूनच आता आपण रोज सामूहिक प्रार्थना करू या, असा विचार ताईंनी मांडला आहे. त्यासाठी रोज काही वेळ किंवा आठवड्यातून एकदा एकत्र येणं, चांगला विचार करणं, प्रार्थना म्हणणं असा उपक्रम सुरू करण्याची त्यांची कल्पना आहे. सोसायटीच्या चार इमारतींमध्ये जी कुटुंब राहतात, त्या प्रत्येक कुटुंबात जाऊन संपर्क करणं, नावनोंदणी करणं, सर्वांनी कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न करणं, अशी सगळी काम तारकाताई मोठ्या उत्साहानं करतात. अशाच प्रकारचं काम त्या आजूबाजूच्या सोसायट्यांमध्येही सुरू करणार आहेत. मुलांसाठी संस्कारवर्ग सुरू करण्याचंही नियोजन करण्यात आलं आहे. त्याप्रमाणे तो उपक्रमही सुरू होणार आहे.
तारकाताई म्हणतात, कुटुंब प्रबोधन, संस्कार हा विषय सर्वांनाच पटतो. आवडतो. त्यामुळे जे उपक्रम केले जातात, त्यांना प्रतिसादही चांगला मिळतो. एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे ती म्हणजे हे काम सतत करत राहण्याचं आहे. एखादा उपक्रम घेतला आणि काम थांबलं असं होता कामा नये आणि त्याचीच मी खूप काळजी घेते. आरंभशूरता असेल तर काम टिकाऊ स्वरूपात होऊ शकत नाही. नवी पिढी सुसंस्कारित करण्याचं, नवी पिढी घडवण्याचं हे काम आहे. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. पालकांचीही चांगली साथ मिळत आहे. त्यामुळे प्रत्येकानं त्याला कृतीची जोड देण्याची आवश्यकता आहे.
चांगला उपक्रम सुरू करण्याचा तारकाताईंचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. चला… आपणही असंच काही तरी छान घडवण्याचा संकल्प करू या…
सौजन्य – विश्व संवाद केंद्र