लोकमत टाइम्सच्या ‘आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
आमच्या समृद्ध परंपरेची नोंद असणाऱ्या नालंदा विद्यापीठाला आग लागली. त्यामुळे भारताचा इतिहास लिहिताना विदेशी प्रवाशांच्या संदर्भाची आम्हाला मदत घ्यावी लागते. त्यामुळे आपला इतिहास इतरांच्या संदर्भावर नको. त्यासाठी आपले दस्तऐवजीकरण जितके होईल तितके केले पाहिजे. भारतीयांनी ती सवय लावली पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.
लोकमत टाइम्स या वृत्तपत्राच्या ‘आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया’ कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मध्य भारतातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील ५२ कर्तृत्ववान व्यक्तींची यशोगाथा असणाऱ्या कॉफी टेबल बुक’चे सोमवारी त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
कार्यक्रमाला ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, प्रसिद्ध उद्योजक व कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नितीन खारा, ‘लोकमत’चे संपादक श्रीमंत माने, ‘लोकमत समाचार’चे वरिष्ठ संपादक विकास मिश्र, ‘लोकमत टाईम्स’चे सल्लागार संपादक पंकज माणिकतला, लोकमतचे संचालक अशोक जैन,आशिष जैन, आसमान शेठ आदी उपस्थित होते.
Tags: NULL