पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत साईबाबा यांचे दर्शन घेतले. त्यानंतर निळवंडे धरणाचे जलपूजन आणि धरणाच्या कालव्याचे लोकार्पण केले. त्यानंतर शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन केले.
यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी मराठीतून सुरवात केली. सर्वात आधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाबामहाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.’२०१४ पूर्वी आकडे फक्त भ्रष्टाचाराचे होते. २०१४ नंतर आकडे फक्त विकासकामाचे आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.
विशेष म्हणजे यावेळी शरद पवार यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर होते. शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? असा प्रश्न विचारुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आताच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी राज्य सरकारने सुरु केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे कौतूक केले.
पंतप्रधान मोदी यांनी शिर्डीमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि कृषीमंत्री राहिलेल्या एका नेत्याने शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल त्यांनी केला आहे.
यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सभेला उपस्थित होते.पैठणीचा फेटा, शाल, साई बाबांची मूर्ती, मंगल कलश आणि तलवार देवून विखे पाटील यांच्याकडून मोदींचे स्वागत करण्यात आले. विष्णूच्या दहा अवताराचे कोरीव काम असलेली तलवार मोदींना भेट देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला.यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत त्यांच्या सबका साथ सबका विकास या घोषणेचे कौतुक केले. पंतप्रधानांनी घालून दिलेल्या मार्गावर चालल्यामुळेच राज्याचा विकास जलदगतीने होतो आहे. असे ते म्हणाले आहेत.