आज सातव्या इंडिया मोबाईल काँग्रेसचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दिल्लीतील प्रगती मैदानावर असणाऱ्या भारत मंडपम मध्ये तीन दिवस ही परिषद असणार आहे. यावेळी रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी देखील उपस्थित होते.
या परिषदेच्या माध्यमातून टेलिकॉम आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने किती प्रगती केली आहे, हे जगासमोर मांडण्यात येईल. २७ ते २९ ऑक्टोबर असे तीन दिवस ही परिषद चालणार आहे. याला जगभरातील २२ देशांमधील एक लाखांहून अधिक प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत.
यावेळी आकाश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींना रिलायन्स जिओ आणि 5G तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती दिली. या तीन दिवसीय परिषदेमध्ये 5G, 6G, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला जाईल. तसेच सेमीकंडक्टर उद्योग, हरित तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा इत्यादींशी संबंधित समस्यांवर चर्चा होणार आहे. यासोबतच नवीन स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी आणि प्रस्थापित उद्योजकांमध्ये परस्पर संबंध वाढवण्यासाठी ‘अस्पायर’ हे अभियान राबवण्यात येणार आहे.