मराठा आरक्षणासाठी राज्यात आणि देशातही मराठा समाज आक्रमक झालेला दिसून येत आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील मराठा समाज आंदोलन करताना दिसून येत आहे.
मालेगावात मराठा आंदोलकांनी नांदगाव फाट्यावर कौळाने येथे मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मालेगाव पुणे महामार्ग रोखला आहे.राजधानी दिल्लीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं जात आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने जंतर-मंतरवर आजपासून उपोषण करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतही आंदोलन करण्यात येत आहे. चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे सकल मराठा समाजातर्फे गुणवंत शेलार यांचे साखळी उपोषण, तर शिरसगाव येथे दिलीप पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ शिर्डी मध्ये सकल मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. पुण्याहून मराठावाड्यात जाणाऱ्या एस टी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.