राज्यात पेटलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची चांगलीच धग आता एसटीला बसत आहे. राज्यभरातले 36 एसटी डेपो बंद करण्यात आले. आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी बसची जाळपोळ करण्यात आली तर काही ठिकाणी तोडफोडही करण्यात आली आहे. मराठवाड्यातील जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे.मुंबई, नागपूर, कोकण, पुणे, अमरावती या विभागांमधली एसटीची सेवा सुरळीत सुरू आहे. आतापर्यंत एसटी बसच्या जाळपोळीत सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे तर वाहतूक काही ठिकाणी पूर्ण बंद किंवा अंशत बंद असल्याने एसटीचा दररोजचा अडीच कोटी रुपयांचा महसूल बुडत असल्याचे समोर आले आहे.
एसटीचे नुकसान आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता एसटी महामंडळच्या नागपूर विभागाने सावध भूमिका घेतली आहे. या मार्गावरील बसचालक व वाहकांना मार्गावर आंदोलनाची माहिती मिळाल्यास परवानगी न घेता पुढे जाऊ नये. अशी सूचना देण्यात आली आहे. याकरिता संबंधित जिल्ह्यातील स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्थिती लक्षात घेऊनच गाडी पुढे सोडण्याचे आदेश बैठकीत सर्व आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. चालक-वाहकांनीही आगार प्रमुखांशी संपर्क साधून परवानगी घेऊनच गाडी नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.