मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकृत.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. ही समिती मराठवाड्यातील मराठ्यांची कुणबी मराठा प्रमाणपत्रांची जुनी नोंदी तपासत आहे. ही समिती हैदराबादसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जावून कागदपत्रांची पडताळणी करत आहे. या समितीने आतापर्यंत कोट्यवधी कागदपत्रांची छाननी केली आहे. या कागदपत्रांमध्ये समितीला 11 हजार पेक्षा जास्त कुणबी मराठा नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या वंशांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला.
कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू
मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग इम्पेरिकल डेटा गोळा करणार
न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड, न्या संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणांत शासनाला मार्गदर्शन करणार
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यादेत मदत करणार.
चेंबूरला अनुसूचित जातीच्या मुला मुलींसाठी आयटीआय कोर्स सुरू होणार
नांदगाव येथील पीएम मित्रा पार्क उभारणीसाठी मुद्रांक नोंदणी शुल्क १०० टक्के सूट
चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग येणार. कायद्यात सुधारणा करणार