महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ३५ व्या गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण
कामगारांचे समर्पण, त्याग आणि कठोर परिश्रमाने महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील राज्य झाले आहे.
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी करण्यात आणि देशातील सर्वात प्रगतिशील आणि आकर्षक औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्राची प्रतिमा निर्माण करण्यात कष्टकरी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी कामगार कल्याण मंडळाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने 35 व्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार, रावबहादूर मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार वितरण सोहळा हुतात्मा बाबू गेनू, मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनात आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार ॲड. मनीषा कायंदे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार सदा सरवणकर, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, जिल्हाधिकारी राजेन्द्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार भारतीय मजदूर संघाला प्रदान करण्यात आला, तर कामगार भूषण पुरस्कार टाटा मोटर्स लिमिटेडचे मोहन गोपाळ गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. सोबतच विविध क्षेत्रातील ५१ गुणवंत कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्रमकल्याण युगविशेष अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे राज्यपालांनी विशेष अभिनंदन केले. कामगार कार्यकर्ते खऱ्या अर्थाने विश्वकर्मा आहेत. ते राज्याचे व देशाचे निर्माते आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीच्या चळवळीत कष्टकरी आघाडीवर होते.
कामगार कल्याणाच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. 1953 मध्ये कामगार कल्याण मंडळ तयार करणाऱ्या पहिल्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक होते. आज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये ५६ लाखांहून अधिक कामगार नोंदणीकृत आहेत.
मंडळाचे ‘क्रीडा संकुल‘ आणि जलतरण तलाव हे नियोक्ते, कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्या त्रिपक्षीय पद्धतीने कल्याण मंडळाने उभारलेल्या निधीतून चालवले जातात. रायफल शूटिंग आणि नेमबाजी, बॅडमिन्टन आदी खेळांसाठी मंडळाकडून सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कामगार साहित्य संमेलन मंडळाने आयोजित केले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. एक प्रकारे कामगार कल्याण मंडळाने देशाला अव्वल खेळाडू, नाट्यकर्मी दिले आहेत. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने राज्यभरातील पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्याच्या कामात कॉर्पोरेट्स आणि उद्योगांना सहभागी करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
आगामी काळात कौशल्याशिवाय नोकऱ्या मिळणार नाहीत. आज औद्योगिक आस्थापनांच्या कामगार गरजा बदलत आहेत. नवीन क्षेत्रात अनेक नोकऱ्या निर्माण होत आहेत. उद्योग आणि उद्योजकांना मल्टीटास्कर असलेल्या कामगारांची आवश्यकता असेल.
तंत्रज्ञानात पारंगत असलेल्या कामगारांना ते प्राधान्य देतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग रोजगाराचे नवीन मार्ग उघडत आहेत. त्यामुळे नवीन कौशल्ये आत्मसात करणा-यांना नवीन अर्थव्यवस्थेत अधिक चांगल्या नोकऱ्या मिळतील. कौशल्य विकासात गुंतलेल्या सर्व संबंधित प्रशिक्षण संस्था आणि विद्यापीठांनी कन्व्हर्जन्ससोबत काम करावे. यामुळे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ महिला आणि पुरुषांना विविध नवीन क्षेत्रात प्रशिक्षण देऊ शकेल. कर्मचाऱ्यांपैकी 93 टक्के कर्मचारी असंघटित क्षेत्रातून येतात. तरीही सर्व संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे कल्याण हाच आपला प्रयत्न असायला हवा. उज्ज्वल आणि अधिक समृद्ध भविष्याची खात्री करताना सर्व कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असले पाहिजे, असेही राज्यपाल श्री. बैस यावेळी म्हणाले.
कामगारांचा विकास महत्त्वाचा – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे
कामगाराचा विकास झाला तरच राज्य व देशाचा विकास होईल, असे कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणाले.
कामगार कल्याण मंडळाच्या अंशदानात वाढ झाल्यानंतर मंडळाकडे विकास कामांसाठी आणि कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार आहे. मंडळाच्या भवनांमधील शिशुमंदिर, शिवणवर्ग, अभ्यासिका, व्यायामशाळा इत्यादी उपक्रमांकरीता नवीन साहित्य उपलब्ध करुन देण्यात येईल.
कामगार कल्याण भवनांमध्ये पाळणाघर आणि अभ्यासिका हे दोन उपक्रम प्राधान्याने राबविण्यात येतील. पती पत्नी दोन्ही कामावर जात असल्यास मुलांचा सांभाळ करण्यासाठी कामगार कल्याण भवनाच्या इमारतींमध्ये पाळणाघर सुरु केल्यास अशा कुटुंबांची मोठी सोय होणार आहे. तसेच या इमारतींमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिका सुरु करण्यात येईल. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, मुंबई शहराच्या विकासात कामगारांचे मोठे योगदान आहे. ज्यांच्या कष्टाने उभे राहिले त्या कामगारांचा आज गौरव होतोय याचा सर्वाधिक आनंद आहे. कामगार भवन वैभवशाली झाले पाहिजे. आज कामगार क्रीडा केंद्राचे रुप बदलत आहे. दिवसभर काम केल्यानंतर थोडे विरंगुळ्याचे क्षण त्यांना मिळावेत यासाठी कामगार क्रीडा केंद्र दर्जेदार असावेत, असा प्रयत्न आहे. 5 ट्रिलियन देशाची अर्थव्यव्स्था करताना महाराष्ट्राचा वाटा 1 ट्रिलियनचा असणार आहे, त्यात कामगारांचा महत्वाचा वाटाही महत्वाचा राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रधान सचिव श्रीमती सिंघल यांनी प्रास्ताविक केले. मंजिरी मराठे यांनी सूत्रसंचालन तर आभार श्री. इळवे यांनी मानले.