शासन आपल्या दारी’ अभियान ; ८८१ कोटी रू. निधीच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
यवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडणार
जिल्ह्यात १६ लाख नागरिकांना ६०१ कोटी रू. निधीतून लाभाचें वितरण
यवतमाळ, दि. 30 : गत दोन वर्षांत राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजना व निर्णयांमुळे युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला, वंचित, दिव्यांग आदी सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
यवतमाळ शहरानजिक किन्ही गावाजवळ ‘शासन आपल्या दारी’ अभियानात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. जिल्ह्यात 881 कोटी रू. निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार भरत गोगावले, प्रा. अशोक उईके, किरण सरनाईक, इंद्रनील नाईक, संदीप धुर्वे, संजीव रेड्डी बोदकुरवार, प्र. विभागीय आयुक्त संजय पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, औद्योगिक विकासाच्या दृष्टीने यवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई, नागपूर या महानगरांशी वेगवान संपर्क होऊन दळणवळण, व्यापार व रोजगार वाढेल. यवतमाळ जिल्ह्यात व्हितारा कंपनीसह नामांकित उद्योग सुमारे 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, मोठी रोजगारनिर्मिती होणार आहे. आदिवासी समाजबांधवांची संस्कृती व गौरवशाली इतिहासाच्या जोपासनेसाठी बिरसा मुंडा वस्तूसंग्रहालय उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. सुपर स्पेशालिटी रूग्णालय येथे पदे लवकरच भरण्यात येतील व ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येईल. वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी 21 हजार शेतक-यांना ‘सौर झटका’ यंत्रांचे वितरण करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. शेतीसाठी आपत्तीकाळातील नुकसानभरपाईचे प्रमाण दुपटीवर नेले आहे. शेतक-यांना एक रूपयात पीक विमा देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. सिंचनासाठी गत दोन वर्षांत 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या किसान सन्मान योजनेत राज्य शासनाने प्रतिव्यक्ती 6 हजार रू. ची भर घालून अंमलबजावणीला गती दिली आहे. नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत देय उपचार निधी दीड लाखाहून पाच लाखांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
जिल्ह्यात अभियान कालावधीत 16 लाख नागरिकांना 601 कोटी रू. निधीतून विविध योजनांचे लाभ वितरण करण्यात आले. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्ह्यात 75 ‘मॉडेल स्कूल’सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने महिलाभगिनींसाठी एसटी प्रवास सवलत, मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘लेक लाडकी लखपती’ योजना, महिला बचत गटांचे खेळते भांडवल दुप्पट करणे, तसेच गटांकडून उत्पादित वस्तूंचे ब्रॅडिंग व विपणन करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून, कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देऊ, अशीही ग्वाही त्यांनी दिली.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले की, राज्य शासन शेतकरी बांधव, महिला व वंचितांसाठी अनेक योजना राबवत असून, भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. सिंचनाच्या दृष्टीने महत्वाची असलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे जिल्ह्यातील अनेक रूग्णांना मदत मिळाली आहे. जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळांतील रिक्त शिक्षक पदे भरण्याची मागणीही त्यांनी केली. खासदार श्रीमती गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध योजनांच्या 25 लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी सौर झटका यंत्राच्या प्रात्यक्षिकाचे अवलोकन केले. त्यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना विविध कृषी अवजारे, तसेच ट्रॅक्टरच्या चाव्या वितरित करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी प्रास्ताविक केले. मंगला माळवे व अमिन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आभार मानले. कार्यक्रमात सुमारे 50 हजार नागरिक उपस्थित होते.
शासन आपल्या दारी अभियानाचा यवतमाळ जिल्हास्तरीय कार्यक्रम ‘रेकॅार्ड ब्रेक’ ठरला. प्रशासनाने 35 हजार लाभार्थ्यांच्या उपस्थितीचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात 50 हजारापेक्षा अधिक लाभार्थी व सर्वसामान्य नागरिकांची उपस्थिती होती. प्रशासनाची उत्तम तयारी आणि लाभार्थ्यांच्या ‘अलोट गर्दी’ने खऱ्या अर्थाने ‘शासन आपल्या दारी’ आल्याचा अनुभव या कार्यक्रमात आला.
सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत आणि पारदर्शकपणे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी दि.1 एप्रिलपासून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात या कालावधीत 16 लाख 21 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभाची रक्कम 601 कोटी ईतकी आहे.
राज्यभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाभ वाटपाचे कार्यक्रम घेतले जात आहे. यवतमाळ येथे आज झालेला 17 वा कार्यक्रम ‘रेकॅार्ड ब्रेक’ ठरला. कार्यक्रमाला 50 हजारापेक्षा जास्त लाभार्थी व नागरिकांची उपस्थिती होती. गेल्या काही दिवसात शासनाने आपल्यासाठी काहीतरी केल्याची भावना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.
कार्यक्रमाला शेतकरी, कष्टकरी, महिला, कामगारांसह समाजातील सर्वच घटक तसेच शासनाच्या विविध योजनेचे लाभार्थी उपस्थित होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाभार्थ्यांना सुखकरपणे कार्यक्रमस्थळी पोहोचता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 498 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवास सुरु करतांना लाभार्थ्यांना नास्ता व पाणी तर कार्यक्रम संपल्यानंतर बसमध्ये भोजन देण्यात आले. लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची संपुर्ण काळजी प्रशासनाने घेतली.
लाभार्थी कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर त्यांना काहीतरी मिळाले पाहिजे, यादृष्टीने विविध शासकीय विभागांचे 55 दालने लावण्यात आले होते. येथे विविध शासकीय विभागांनी आपल्या योजनांची लाभार्थ्यांना माहिती दिली. आलेल्या लाभार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते. त्याचा असंख्य लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणी, समस्या, तक्रारी असतात. त्याची शासनस्तरावर दखल घेतली जावी, असे त्यांना वाटत असते. यासाठी जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरु करण्यात आले. कार्यक्रमस्थळी देखील अशा तक्रारींची दखल घेण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे स्वतंत्र दालने लावण्यात आली होती. त्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे चार स्वतंत्र पथके नेमण्यात आले होते.
सुशिक्षित बेरोजागारांसाठी कार्यक्रमस्थळी रोजगार मेळावा घेण्यात आला. त्याला देखील युवकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांच्यावतीने आपल्याकडील रिक्त 1 हजार 500 पदांसाठी युवकांच्या मुलाखती घेतल्या.
प्रशासनाने भव्य सभामंडप कार्यक्रमस्थळी तयार केला होता. आलेल्या कोणत्याही लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना नीट बसता यावे यासाठी नियोजनाप्रमाणे 35 हजार खुर्च्यांची मांडणी करण्यात आली होती. प्रत्येक खुर्चीवर पाण्याची बॅाटल व ओआरएसचे पाकीट ठेवण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी वैद्यकीय व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.
जिल्हाभरातून येणाऱ्या शासकीय व खाजगी बसेस, छोटी वाहने यांच्या पार्कींगचे उत्तम नियोजन झाल्याने कुठेही गैरसोय झाली नाही. वाहनाच्या प्रकाराप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र वाहनतळ करण्यात आल्याने वाहने, लाभार्थी व वाहनचालकांची सुविधा झाली. वाहनांचा कुठेही अधिकवेळ थांबावे लागले नाही.
फेटेधारी सरपंचांनी वेधले लक्ष
कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील सरपंचांना निमंत्रित करण्यात आले होते. या सरपंचांना मंडपात पुढच्या ठिकाणी बसविण्यात आले. विशेष म्हणजे येथे आलेल्या प्रत्येक सरपंचास फेटे बांधण्यात आल्याने हे फेटेधारी सरपंच लक्षवेधक ठरले. इतक्या मोठ्या कार्यक्रमात त्यांना विशेष मान मिळाल्याने खऱ्या अर्थाने आपण गावाचे खरे कारभारी असल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.
पोवाड्यांची आणली रंगत
मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्थानिक कलावंत गजानन वानखडे व त्यांच्या संचाने पोवाडे, मराठी गीते, मनोरंजनातून जनजागृतीचा अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केला. संचातील कलावंतांच्या सादरीकरणाने उपस्थित हजारो लाभार्थ्यांचे मनोरंजन केलेच शिवाय मनोरंजनातून प्रबोधनही केले.
लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व रोपटे
कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना कार्यक्रमात सहभाग नोंदविल्याबद्दल परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये बसतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री स़जय राठोड यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र त्यांच्या हातात देण्यात आले. यासोबतच प्रत्येक लाभार्थ्यास वेगवेगळ्या फळांचे एक रोपटे देखील देण्यात आले.