राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलने तीव्र झाली असून काही ठिकाणी रास्ता रोको आणि जाळपोळीचे प्रकार सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्तक झालेल्या ठाणे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील निवासस्थान परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. शिवाय, शहरातील राजकीय तसेच इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या निवसास्थान परिसरातील सुरक्षेत पोलिसांनी वाढ केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून करण्यात येणारी आंदोलने तीव्र झाली असून जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये संदीप क्षीरसागर आणि माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंखे यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली. तसेच मंत्री, खासदार, आमदार यांच्या वाहनांना अडविले जात आहे. अनेक ठिकाणी राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्या जाळण्यात आल्या आहेत.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीचीही आज तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील कुलाबा येथील आमदार निवासाजवळ हसन मुश्रीफ यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.त्यांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे.याठिकाणीही बंदोबस्त वाढविण्यात आला.