मुंबई, १ नोव्हेंबर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षण देण्यावर सर्वांचे एकमत झाल्याचे सांगितले. सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यावर सर्वांचे एकमत झाले. इतर समाजावर अन्याय न करता कायद्याच्या चौकटीत राहूनच आरक्षण असावे, असा निर्णय घेण्यात आला.”
मुख्यमंत्र्यांनी लोकांना शांतता राखण्याची आणि सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची विनंती यावेळी केली. “मनोज जरंगे पाटील यांना माझी विनंती आहे की त्यांनी सरकारच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवावा. या आंदोलनाला नवी दिशा मिळू लागली आहे. राज्यात ज्या हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत, त्या अयोग्य असून आंदोलनाची बदनामी होत आहे. आम्ही या घटनांचा ठामपणे निषेध करतो. सर्वसामान्यांना असुरक्षित वाटू नये. मी सर्वांना विनंती करतो की कायदा हातात घेऊ नये आणि शांतता राखावी आणि राज्य सरकारला सहकार्य करावे”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, दादाजी भुसे आदी उपस्थित होते. त्यांच्याशिवाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह आपापल्या पक्षांचे अनेक नेते या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित होते.