‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून बुधवारी (दि. 1) राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी छत्तीसगड येथील चित्रोत्पला लोककला परिषद तसेच आंध्र प्रदेशातील तेलुगू कला समिती यांच्यावतीने तिन्ही राज्यांच्या लोककला व संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
यावेळी बोलताना राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, आद्य शंकराचार्यांनी संपूर्ण देशाला समान संस्कृतीच्या धाग्याने जोडण्याच्या उद्देशाने देशाच्या वेगवेगळ्या दिशांना चार मठांची स्थापना केली. धर्माचे अधिष्ठान दिल्यास नागरिक एका भागातून दुसऱ्या भागात पर्यटनाला जातील व त्यातून नव्या संस्कृतीची ओळख होईल, या उद्देशाने त्यांनी पीठांची स्थापना केली, असे नमूद करुन ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘ या उपक्रमातून प्रत्येक राज्याने इतर राज्याची संस्कृती जाणून घ्यावी, या हेतूने सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरातील सर्व राजभवनांमध्ये 1 नोव्हेंबरला या एकाच दिवशी 8 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिन साजरे करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राजभवन येथे हरियाणा, कर्नाटक, केरळ, पंजाब व तामिळनाडू तसेच पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस देखील बुधवारी (दि. 1) दुपारी साजरा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Tags: NULL