काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष पर्वतरांगांच्या पलिकडे असलेल्या पाकिस्तानात पोहचला पाहिजे. छ्त्रपतींचा हा पुतळा प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यामुळे सगळ्यांना प्रेरणा मिळेल.शत्रूच्या छातीत देशाचा तिरंगा गाडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सैनिकांना प्रेरित करेल त्यांना उर्जा देईल. त्यामुळे शत्रूची आपल्याकडे बघायची हिंमत होणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वेळी म्हणाले आहेत.
तर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराज या नावातच ऊर्जा आहे. त्यांच्या पुतळा हा प्रेरणादायी असून वाईट नजरेने देशाकडे पाहणाऱ्यांसाठी इशारा आहे. महाराष्ट्राच्या सरकारची कधीही मदत लागली तर आम्ही जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत आम्ही तुमच्या सदैव सोबत राहू. 41 आर आर ही बटालियन नेहमीच तयार असते.
आम्ही पुणेकर या संस्थेतर्फे हा पुतळा बसवण्यात आला आहे.