गेल्या दोन दिवसांपासून सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. हे शिष्टमंडळ मात्र आज संध्याकाळी पाच वाजता जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
मंगळवारी हे शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरच्या दौऱ्यावर गेल्याने शिष्टमंडळ संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून जरांगे यांना देण्यात आली होती. तसेच, बुधवारी हे शिष्टमंडळ येणार असल्याचे देखील सांगण्यात आले होते. त्यानुसार, आज संध्याकाळी पाच वाजता सरकारचे हे शिष्टमंडळ संभाजीनगर मध्ये पोहोचणार आहे. तेथून जरांगे उपचार घेत असलेल्या रुग्णालयात जाऊन शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये मंत्री अतुल सावे, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे आणि उदय सामंत यांचा समावेश असणार आहे.