भारतीय आदिवासी स्वातंत्र्यसैनिक आणि मुंडा जमातीचे लोकनायक वीर बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड मधील उलिहाटू या गावात झाला. त्यांच्या आईचे नाव कर्मी मुंडा आणि वडिलांचे नाव सुगना मुंडा होते.
त्यांचे प्राथमिक शिक्षण सालगा या गावात झाले. पुढील शिक्षणासाठी जर्मन मिशन स्कूलमध्ये प्रवेश घेण्यास सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना धर्म परिवर्तन करावे लागले. अभ्यासादरम्यान ख्रिश्चन शाळेमध्ये आदिवासी धर्माबद्दल व संस्कृतीची खिल्ली उडविली जायची, हे वर्तन त्यांना आवडत नसे म्हणून त्यांनी शिक्षण सोडले. त्यांनी आदिवासी जीवन शैलीवर लक्ष केंद्रित केले आणि समाजाच्या कल्याणासाठी लढा दिला.
बिरसा मुंडा यांनी १८९५ मध्ये नवीन धर्म सुरु केला ज्याला बरसाइत असे म्हणतात. या धर्माच्या प्रचारासाठी १२ विषय निवडण्यात आले. या धर्माचे
लोक निसर्गाला देव मानतात व त्याची पूजा करतात.
बिरसा मुंडा यांनी स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने व मदतीने ब्रिटीश सरकारच्या अत्याचार विरोधात छोटा नागपूर या भागात मोठा लढा उभा केला.
मुंडा आदिवासींच्या नेतृत्वामध्ये १९व्या शतकात बंडखोर नायक ठरलेल्या बिरसा मुंडा यांनी बलाढ्य आणि अशी आक्रमक एक चळवळ उभी केली. ज्या चळवळीला ”उलगुलान’ असे म्हणतात. शोषणाविरुद्ध लढा देण्यासाठी आदिवासींचे प्रबोधन करण्याचे महत्त्वाचं काम त्यांनी केलं. मुंडा यांच्यासह त्यांच्या अनुयायांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचा जोरदार प्रतिकार केला. बिरसा मुंडा यांनी आपल्या नैसर्गिक हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय बदलाची प्रक्रिया होती.
अखेर ३ मार्च १९०० रोजी, जामकोपाई जंगल,चक्रधरपूर येथून ब्रिटिश सैन्याने त्यांना अटक केली. ९ जून १९०० रोजी वयाच्या २५व्या वर्षी रांचीच्या तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला. मातीचे रक्षण करताना ते शहीद झाले त्याचे स्मरण म्हणून १५ नोव्हेंबर हा दिवस “आदिवासी गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो.
आजही बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये बिरसा मुंडा यांची देवासारखी पूजा केली जाते.
त्यांच्या स्मरणार्थ रांची येथील मध्यवर्ती कारागृह आणि विमानतळाला “बिरसा मुंडा” यांचे नाव देण्यात आले आहे.
सौ.मधुरा मनोज रोझेकर
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र