लाला लजपत राय यांचा आज स्मृतिदिन.
दि. 28 जानेवारी 1865 रोजी जन्मलेले लाला लजपतराय हे भारतीय क्रांतिकारक, राजकारणी आणि लेखक होय.त्यांना लाला लजपत राय म्हणून ओळखले जाते. उत्तर भारतात जेष्ठ व श्रेष्ठ व्यक्तिंना ‘लाला’ या सन्मानाने संबोधले जाते.ते पंजाब केसरी तसेच ‘ पंजाब दा शेर ‘म्हणूनही प्रसिद्ध होते, ज्याचा अर्थ ‘पंजाबचा सिंह’ असा होतो.
लाला लजपतराय यांचे वडील मुन्शी राधाकृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते. १८४९ मध्ये लाला लजपतरायांचा विवाह राधादेवींशी झाला.
ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील जिल्हा ( आता मोगा जिल्ह्यात ,पंजाब , भारत). त्यांनी आपल्या तरुणपणाचा बराच काळ जगरांव येथे घालवला .त्यांचे घर आजही जगरांव येथे आहे व तेथे ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय आहे. त्यांनी जगरांव येथे आर.के हायस्कूल ही पहिली शैक्षणिक संस्था बांधली.
१८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडिलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपतरायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.सुरुवातीच्या आयुष्यात लजपतराय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपतरायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले.लाहोरमध्ये शिकत असताना स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.
हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले.भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या.१८८४मध्ये त्यांच्या वडिलांची बदली रोहतक येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून लजपतरायसुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडिलांच्या बदलीबरोबर हिसारला आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला.बाबू चूडामणींसह लजपतराय हिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.
लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची लजपतरायांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजीलाल हुडा, डॉ.धनीराम, आर्यसमाजी पंडित मुरारीलाल, शेठ छाजूराम जाट आणि देवराज संधीर यांच्याबरोबर लाला लजपतरायांनी आर्य समाजाची स्थापनासुद्धा केली.
१९१४मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपतरायांनी वकिलीला रामराम ठोकला. १९१४ मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर १९१७ मध्ये अमेरिकेला गेले. ऑक्टोबर १९१७ मध्ये त्यांनी न्यू यॉर्कमध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली.ते १९२७ ते १९३०पर्यंत अमेरिकेत होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर, मे १९०७मध्ये कोणताही खटला न चालवता लाल लजपतरायांची ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मिंटो यांनी ठरवल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.
१९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना केली. भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत रायांनी केले. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले. जखमी होऊनसुद्धा लाला लजपतरायांनी या जमावासमोर भाषण केले. “आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो.” हे त्यांचे यावेळचे उद्गार होते.
निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपतराय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले.
स्कॉटच्या लाठीमारामुळे लालाजींचा मृत्यू ओढवला, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपस्थित करण्यात आला तेव्हा, यात आपली काहीही भूमिका नव्हती, असे ब्रिटिश सरकारने जाहीर केले.
या घटनेचा सरदार भगतसिंग यांचेवर खुप प्रभाव पडला व या घटनेचा सूड घेण्याचे भगतसिंग यांनी ठरवले एका महान क्रांतिकारकाला येथूनच प्रेरणा मिळाली.
लाला लाजपत राय यांनी यंग इंडिया,द कलेक्टेड वर्क्स ऑफ लाला लजपत राय,लाला लजपत राय रायटिंग ॲन्ड स्पीचेस,मॅझिनी, गॅरिबाल्डी, शिवाजी महाराज यांची उर्दू भाषेत लिहिलेली संक्षिप्त चरित्रे,श्रीकृष्ण आणि त्याची शिकवण,महान अशोक अशा अनेक पुस्तकांचे लिखाण केले.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये लाल, बाल व पाल या त्रिकुटाने स्वातंत्र्य प्राप्तीसाठी फार मोठा पाया रचला.अशा या महान विभुतीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
सौ.वर्षा मानेकर
येरवडा भाग.
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र