समाजकंटकांच्या त्रासाविरोधात गावकरी एकत्र
मौजे गुहा (ता. राहुरी, जि. नगर) येथील श्री कानिफनाथ मंदिरात समाजकंटकांनी वारकऱ्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वारकरी संप्रदायाच्या वतीने उद्या मंगळवार (२१ नोव्हेंबर) रोजी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू रक्षक वारकरी संत परीषद आणि सकल वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे.
मौजे गुहा येथे गेल्या सोमवारी (१३ नोव्हेंबर) वारकरी भजन करत असताना काही समाजकंटकांनी जमावात येऊन भजन करत असलेल्या वारकऱ्यांना धक्काबुक्की केली. तसेच वारकऱ्यांच्या दृष्टीने पवित्र असलेल्या टाळ-मृदंगाची तोडफोड केली. श्री पांडुरंगाच्या कपाळी असलेला पवित्र बुक्क्याची विटंबना करुन महिला वारकऱ्यांना दमदाटी करत शिवीगाळ केली. तसेच पुजाऱ्याला मारहाण करण्यात आली.
या सर्व प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात रोष पसरलेला असून वारकरी समुदायातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी मंगळवारी राहुरी तहसील येथे निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा वाय.एम.सी. ग्राऊंड राहुरी येथून नवी पेठ मार्गे जाणार असून राहुरी तहसील कार्यालय येथे त्याची सांगता होईल, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
प्राचीन श्रद्धास्थान
गुहा (जि. नगर) या गावाचे आराध्य दैवत कानिफनाथ महाराज यांचे प्राचीन मंदिर आहे. श्री कानिफनाथ महाराजांनी आपल्या अलौकिक शक्तीतून एक गुफा (गुहा) निर्माण केली व ती गुफा आजही येथे पहावयास मिळते. म्हणूनच या गावाला ‘गुहा’ हे नाव पडलेले आहे.
कानिफनाथ देवस्थानाची जमीन ही रेकॉर्ड ऑफ राईटमध्ये कानिफनाथ देवस्थान गुहा अशी होती. इनाम कमिशननुसार श्री कानिफनाथ महाराज मंदिराला ४० एकर इतकी जमीन इनामी आहे. येथे पुजारी नेमलेल्या मुस्लिम लोकांनी या जमिनीवर अनधिकृतपणे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ हे नाव लावले व त्यानंतर मुतावली ट्रस्ट स्थापन केले. नंतर त्यांनी उताऱ्यावर कानिफनाथ देवस्थान गुहा हे नाव काढून तेथे कान्होबा देव उर्फ रमजानशहा बाबा दर्गा वक्फ असे नाव देण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ यांच्याकडून आणला होता. मात्र गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन आदेशाला हरकत नोंदवून आजपर्यंत सदर नोंद होऊ दिलेली नाही.
या मंदिरात पुरातन काळापासुन पूजा-अर्चा, आरती केली जाते. तसेच दर गुरुवारी व अमावस्येला महाआरती व महाप्रसाद असतो. गावातील व परिसरातील भजनी व महिला भजनी तेथे भजन व पारायण करीत असतात व तसेच वार्षिक देवस्थानची यात्रा रंगपंचमीला तीन दिवस चालते. त्यावेळी सर्वधर्मीय नागरिक ही यात्रा साजरी करतात. मात्र समाजकंटकांकडून कधी प्रसादास लाथा मारणे, पिण्याचे पाणी सांडून देणे, मंदिराच्या पायरीवर स्वच्छतागृहाचे पाणी टाकणे, पुजाऱ्यांना वेळोवेळी दम देणे, धमकावणे असे प्रकार करण्यात येतात. या सर्वाचा 13 नोव्हेंबर रोजी कळस होऊन त्यांनी मंदिराचे पुजारी व भजनी मंडळींना जबर मारहाण केली. तसेच टाळ-पखवाज फोडला व त्याची विटंबना केली. भगव्या झेंड्यास पायदळी तुडवून व हातात कोयते व दांडे घेऊन दहशत निर्माण केली व व हिंदू वारकरी संप्रदायाचा अपमान केला.