२४ नोव्हेंबर – ‘लाचित दिवस’, आसाम.
‘लचित बडफुकन’ हे नाव आसामच्याच नव्हे तर भारताच्याही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे असा त्यांचा पराक्रम आणि कर्तृत्व आहे. २४ नोव्हेंबर १६२२ रोजी जन्मलेले लचित आसामच्या अहोम साम्राज्याचे सेनापती होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आसामी सेनेने मुघलांच्या प्रचंड सेनेवर अभूतपूर्व विजय मिळवला होता.
भारताच्या पूर्वोत्तर भागातील सर्वात मोठे राज्य म्हणजे आसाम. प्राचीनकाळी हे राज्य प्राग्ज्योतिषपूर नावाने ओळखले जाई. ब्रह्मपुत्र नदी ही इथली जीवनवाहिनी. घनदाट जंगले आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या या राज्याचे दूरदूरच्या राज्यांशी व्यापारी संबंध होते. पण संपन्नतेमुळेच या राज्यावर कायम युद्धाचे सावट असे. १३व्या शतकापासून इथे आहोम राजवंशाने राज्य केले. याच काळात भारतावर परकीय आक्रमणे होऊ लागली. पुढे १७व्या शतकात मुघल प्रबळ झाले आणि त्यांची वक्रदृष्टी आसामकडे वळली. आसामवर अनेकवार हल्ले आणि युद्ध करून, अखेरीस १६६१ मध्ये त्यांनी गुवाहाटी आणि आसपासच्या मोठ्या प्रदेशावर कब्जा मिळवला. त्यानंतर गादीवर आलेल्या चक्रध्वज या आहोम राजाने मुघलांकडून आपले गेलेले राज्य परत मिळवण्याचा चंग बांधला. त्यांनी आपल्या सैन्याची छोट्या तुकड्यांमध्ये पुनर्रचना केली. १०० सैनिकांवर सैनिया, १,००० सैनिकांवर हजारीका, ६,००० सैनिकांचा प्रमुख फुकन आणि अश्या सर्व तुकड्यांचा नायक तो बडफुकन! राजा चक्रध्वजाने नव्या सैन्याचा बडफुकन म्हणून लचितची नियुक्ती केली. मुघलांशी समोरासमोर युद्धात जिंकणे अशक्य आहे हे लक्षात घेऊन लचित यांनी नवीन युद्धनीती आखायचे ठरवले. ब्रह्मपुत्र नदीवर सहज संचार करेल असे आहोम नौदल त्यांनी उभारले. त्याजोडीला सैन्याला पुरेशी आणि आधुनिक शस्त्रास्त्रे मिळवून दिली. मग लवकरच या सुसज्ज सैन्याने गुवाहाटी आणि असपासचा प्रदेश मुघलांच्या तावडीतून मुक्त केला.
ही बातमी कळताच औरंगजेब खवळला आणि त्याने मिर्झा राजा जयसिंगचा मुलगा रामसिंग याला प्रचंड मोठे सैन्य देऊन आसामच्या स्वारीवर पाठवले. ३० हजार पायदळ, १८ हजार घोडदळ, १००० तोफा यांचा समावेश यात होता. इतके प्रचंड सैन्य चालून येते आहे हे कळताच लचित यांनी आपली व्यूहरचना ठरवली आणि सराईघाट या जंगले आणि टेकड्यांनी वेढलेल्या प्रदेशापर्यंत मुघल सैन्याला आत येऊ दिले. पण यापुढील मार्ग त्यांना खिंडीत पकडून आहोम सैन्याने रोखून धरला. अनेकवार प्रयत्न करूनही मुघलांना पुढे जाता येईना. त्यातच रात्रीच्या वेळी छापेमारी करत आहोम सेनेने मुघल सेनेला त्रस्त करून सोडले. गनिमी काव्याच्या या युद्धतंत्रामुळे त्रासलेल्या मुघल सैनिकांचे मनोधैर्य खचू लागले. शेवटी रामसिंगाने नावांवर तोफा चढवल्या आणि नदीतून आहोम सैन्यावर हल्ला करीत पुढे जाण्याचे ठरवले. ही युक्ती यशस्वी झाली. मुघलांपुढे माऱ्यापुढे आहोम सैन्याचा प्रतिकार कमी पडू लागला, त्यांची पीछेहाट होऊ लागली.
या काळात तापाने आजारी असल्याने लचित युद्धभूमीवर उपस्थित नव्हते. युद्धाचा रंग बदलू लागल्याची बातमी कळताच आजारी असूनही त्यांना युद्धात उतरायचे ठरवले. हतबल झालेल्या आपल्या सैनिकांना ते म्हणाले, ‘तुम्हाला पळून जायचे तर तुम्ही जाऊ शकता पण आहोम महाराजांनी माझ्यावर जे काम सोपवले आहे ते मी उत्तमप्रकारे पूर्ण करणारच’. लचित यांना स्वतः युद्धाचे नेतृत्व करताना पाहून त्यांच्या सैन्यात नवा आवेश संचारला. आपल्या बडफुकनच्या मार्गदर्शनानुसार थोड्याच काळात आहोम सैनिकांनी ब्रह्मपुत्र नदीमध्ये नावांचा एक पूल तयार केला. त्यावरून हे सैनिक सहजगत्या उड्या मारत जाऊ शकत होते, पण मुघलांना हा प्रकारच नवीन होता. संधीचा उपयोग करीत आहोम सैनिकांनी मुघल सैन्यात घुसून तुफान कापाकापी सुरू केली. थोड्याच वेळात मुघलांचा नौदलप्रमुख आणि त्यांचे ४०००हुन अधिक सैनिक मारले गेले. हे पाहून गर्भगळीत झालेल्या उर्वरित सैन्याने लढायला नकार देऊन शरणागती पत्करली.
पाण्यात आणि जमिनीवर एकाच वेळी लढालेल्या युद्धाचे नेतृत्व, एकच माणूस करतो आणि या विषम युद्धात लहानश्या सेनेला विजय मिळवून देतो हे अद्भुत दृष्य मुघल सेनापती रामसिंगाने प्रथमच पाहिले. सराईघाटच्या युद्धात लचित यांचे शौर्य, रणचातुर्य आणि नेतृत्वगुण यामुळे आसामला विजय मिळाला आणि ते साऱ्या आसामचे नायक बनले. मात्र पुढे वर्षभरातच प्रकृती बिघडल्याने, अवघ्या ५१व्या वर्षी, लचित यांचा मृत्यू झाला; परंतु त्यानंतरही १५० वर्षे आसामकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणत्याही शत्रूही हिम्मत झाली नाही.
१६७२ मध्ये, लचित यांच्या मृत्यूपश्चात, जोरहाटजवळ हुलुंगपारा येथे आहोम राजांनी त्यांचे स्मारक उभारून त्यांचा यथोचित सन्मान केला. आजही आसाममध्ये लचित बडफुकन सर्वात लोकप्रिय सेनानी म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्मदिवस २४ नोव्हेंबर हा आसाममध्ये ”लचित दिवस” म्हणून साजरा केला जातो. १९९९ पासून, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये, सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याला (कॅडेटला) “लचित बडफुकन सुवर्णपदक” देऊन गौरविण्यात येते.
महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात मुघलांना टक्कर देत हिंदवी स्वराज्य स्थापनेचे दिव्य कार्य करीत होते, त्याच काळात सेनापती लचित बडफुकन आहोम राज्याचे मुघलांपासून रक्षण करीत होते. छ. शिवाजी महाराजांना लाचित आपला आदर्श मानीत असत. हे दोघे मुघलांविरुद्ध एकत्र येऊ शकले असते तर औरंगजेब आणि मुघलांची सत्ता केव्हाच भारतातून उखडली गेली असती आणि भारताचा इतिहास निश्चितच वेगळा झाला असता.
सौ. शलाका अजेय गोटखिंडीकर.
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे