राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या २०० जागा आहेत, मात्र १९९ जागांवर मतदान होत आहे. आमदार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनामुळे करणपूर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यावेळीही ते याच जागेवरून निवडणूक लढवत होते.
राजस्थान मध्ये मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेस मध्ये असणार आहे.
भाजपने राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर काँग्रेसने २०१८ प्रमाणेच आपला मित्रपक्ष राष्ट्रीय लोक दल (RLD) साठी एक जागा सोडली आहे.
सत्ताधारी काँग्रेसच्या प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी, मंत्री शांती धारिवाल, बीडी कल्ला, भंवर सिंग भाटी, सालेह मोहम्मद, ममता भूपेश, प्रताप सिंग खाचरियावास आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा समावेश आहे.
भाजपच्या प्रमुख उमेदवारांमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड, विरोधी पक्ष उपनेते सतीश पुनिया, खासदार दिया कुमारी, राज्यवर्धन राठोड आणि बाबा बालकनाथ आदी उमेदवार रिंगणात आहेत.
या निवडणुकीचा निकाल मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामसह 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.