अष्टपैलू_राजमाता_जिजामाता
पारिवारिक_दायित्व
जिजाबाई एक राजनीती तज्ञ होत्या. त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी राजनैतिक विषयांमध्ये सक्रिय भूमिका बजावली. जिजाबाईंनी सैन्यामध्ये अठरापगड जातीतील स्थानिक गावकऱ्यांमधून विश्वासू तरुणांना घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. ज्यामुळे स्वराज्य संस्थापनेसाठी त्यांची शक्ती व मदत मिळाली. जिजाबाई #गनिमी
युद्धकलेच्या प्रबळ समर्थक होत्या व त्यांनी मराठा सेनेची रणनीती विकसित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
जिजाबाई महान, साहसी, बुद्धिमान व दूरदर्शी स्त्री होत्या. ज्यांनी आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सामाजिक रूढी व परंपरा व अपेक्षा यांना आव्हान दिले.
जिजाबाईंचे पिताजी जाधवराव दौलताबादला गेले होते. जाधवराव किल्ल्यावर पातशहाच्या भेटीस गेले असताना तेथे पातशहाच्या मारेकऱ्यांनी जाधवराव व अचलोजी रघोजी हे दोन पुत्र आणि नातू यशवंतराव यांची निर्घृण हत्या केली.
जिजाबाईंचे थोरले चिरंजीव शंभुराजे कनकगिरीच्या मोहिमेवर होते. शंभूराजे शर्थीने झुंज देत होते. शहाजीराजांनी अफजल खान यांना शंभूराजांच्या मदतीला कुमक पाठविण्यास सांगितले होते पण त्यांनी शंभुराजांना मदत पाठविली नाही. अफजल खानाने दगा दिल्यामुळे शंभूराजांचा त्या लढाईत अंत झाला. जिजाबाईंना त्यांचा मुलगा गेल्याचे वृत्त व खानाकडून झालेला पतीचा अपमान या घटना प्रचंड दु:खांच्या व जिव्हारी लागणाऱ्या होत्या.
पारिवारिक दुःख क्लेशदायक होती पण त्यातून स्वतःला धैर्याने उभे करत ही स्वराज्य जननी आपल्या प्रजाजनांच्या हित रक्षणासाठी बालचमू ला शौर्याचे धडे देत होती.
कसबी सुईण गोजाक्कानी जिजाऊंना सईबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले पण हे बाळंतपण सईबाईंना मानवले नाही असे सांगितले..कोंढाणा स्वराज्यात रुजू झाला खरे पण राजांचा एक ‘भाव गड’ झुरू लागला. पुरंधरावर सईबाईंची तब्येत ढासळू लागली. जिजाबाईंनी महाडहून दुखणे पारखी गंगाधर वैद्य यांना बोलावणे धाडून गडावर आणले. बरेच दिवस त्यांनी आपले वैद्यक डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर उपचार केले. त्यांना व्याधीचे निदान कळून चुकले होते. सईबाईंना बाळंतव्याधी जडली आहे असे वैद्यांनी जिजाबाईंना सांगितले. वैद्यांकडून वेगवेगळी औषधी मात्रा जिजाऊ सईबाईंना देत होत्या. जिजाबाईंनी व्रतवैकल्ये उपवास सुरू केले. अंगारे, धुपारे, लिंबलोण सारे सईबाईंच्या पुढे हरत होते. गडावरील थंडगार वाऱ्यामुळे सईबाईंच्या शरीरावर परिणाम झाला. त्यांनी अंथरूण धरले. काही महिन्यांनी सईबाईंनी राजगडावर देह ठेवला. पण संयम, धैर्याची मूर्ती असलेल्या जिजाबाईंनी, त्यातूनही स्वत:ला सावरले आणि सईबाईंचा मुलगा #संभाजी याला माया ममतेने घडवणे सुरू केले.
राजे शिवाजी आग्रा येथे जाण्यासाठी रवाना झाले. जिजाबाईंनी राज्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी घेतली. त्यानंतर जिजाबाईंच्या जीवनात अनेक घटना घडल्या. काही चांगल्या व काही वाईट आणि काही दुःखद. त्यांनी संयमाने सगळे सहन केले.
सिद्धी जौहरने पन्हाळगडावर जेव्हा शिवाजी महाराजांस वेढा देऊन रोखून ठेवले तेव्हा स्वत: राजमाता जिजाबाईंनी सैन्य जमवून हाती तलवार घेतली व शिवाजी महाराजांना सोडवायला त्या सज्ज झाल्या. त्यांचा आवेश, उत्साह, वीरश्री हे इतर सरदारांना उत्तेजन देणारे ठरले. प्रसंगावधान हा गुण येथे प्रकर्षाने दिसतो.
जिजामातेने सक्तीने परधर्मात बाटविलेल्यांना पुनश्च शुद्धीकरण करून स्वधर्म, जात व गोतात घेण्याची प्रथा सुरू केली. प्रत्यक्ष सईबाईंचा भाऊ बजाजी निंबाळकर यालाही अफजलखानाने बळजबरीने मुसलमान केले होते. जिजाबाईंनी बजाजीला शास्त्रशुद्धपणे पुन्हा हिंदू धर्मात घेतले; परंतु त्याला समाजाने स्वीकारणे, पूर्वीसारखा मानसन्मान मिळणे हे सहजसाध्य नव्हते. तेव्हा जिजामातेने आपली नात सखूबाई हिच्याशी बजाजीचा मुलगा महादजी याचे लग्न लावून दिले. हे सामाजिक_धैर्य असामान्य होते. ‘समाजसुधारणेशी आणि स्वधर्म रक्षणाची’ सुरुवात घरापासूनच करण्याचे संकेत यातून त्यांनी दिले.
१६६४ साली शिकार करताना घोड्यावरून पडल्याचे निमित्त होऊन राजे शहाजी मरण पावले. त्यावेळी राजमाता जिजाबाई ६७ वर्षांच्या होत्या. वृद्धपकाळात वैधव्याचा आघात त्यांची जगण्याची उमेद नाहीशी करणारा होता. त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला; पण राजे शिवाजी यांनी ‘‘माँसाहेब, असे करू नका,’’ म्हणून विनवणी करत ‘‘आमचा पुरुषार्थ आणि हिंदवी स्वराज्याच्या राजाचा राज्याभिषेक आम्ही कोणास कौतुके दाखवावा?’’ असा हृद्य प्रश्न त्यांना केला. राजमातेचे अंत:करण द्रवले. त्यांनी सती जाण्याचे रद्द केले. पुत्रप्रेम तर होतेच पण कर्तव्यपूर्तीसाठी राजमातेने जगायचे ठरवले. स्वराज्याचा उत्कर्ष, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिल्याशिवाय डोळे मिटायचे नाही हा निर्धार केला;
गोरगरिबांची दु:खे निवारण करून त्यांना सुखी करण्याचे, तर आपल्या वैयक्तिक संपत्तीमधून काही रक्कम, सोने-नाणे देऊन त्यांना मदत करायला हवी या विचारातून जिजाईंनी एक वेगळाच मार्ग स्वीकारला. सूर्यग्रहणाच्या निमित्ताने त्यांनी महाबळेश्वर येथे सुवर्णतुला करून ते सोने गोरगरिबात वाटण्यास शिवबाला सांगितले. दानधर्माचे हे शिक्षण तिने शिवबांना कृतीतून दिले. त्यांचा हेतू साध्य झाल्याचे शिवाजी महाराजांच्या पुढच्या आयुष्यात दिसून आलेच.
शिवाजी महाराज आता खरोखरचे शूरवीर, योद्धे, लढवय्ये, खंबीर झाले होते. त्यांचा पराक्रम अथांग होता. मनात गोरगरिबांची कणव होती. त्यांनी हिंदवी स्वराज्य प्रस्थापित केले होते. असा आपला इतिहास घडवणारा पुत्र राजा व्हावा, त्याचा ‘राजा’ म्हणून धर्म संमत राज्याभिषेक व्हावा ही अंतरीची इच्छा जिजाबाईंनी शिवरायांना बोलून दाखविली, ‘शिवबा, तुझे वडील स्वपराक्रमाने वजीर झाले. बलशाली राजासारखे जगले. पण ‘राजे’ झाले नाही. तू आता ‘राजा’ हो. मला तो सुखसोहळा डोळे भरून पाहू दे.’’ म्हणून सांगितले.
आपल्या वृद्ध आणि थकलेल्या मातेची ही इच्छा शिवबाने पूर्ण केली. ‘‘गोब्राम्हण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंतस श्री शिवछत्रपती सिंहासनाधीश्वर शिवाजी महाराज ह्यांचा विजय असो’’ या जयजयकारात रायगडावर हा सोहळा संपन्न झाला.
६ जून १६७४ रोजी राजमातेचे स्वप्न पूर्ण झाले आणि कृतकृत्य झालेल्या या राष्ट्रमातेने त्यानंतर अकरा दिवसांनी म्हणजे १७ जून, १६७४ बुधवारी मध्यरात्री छत्रपती शिवबाकडे अतीव समाधानाने बघत आपली इहलोकाची यात्रा संपविली. शककर्ता कल्याणकारी राजा घडवणारी माऊली अनंतात विलीन झाली….
आपल्या मनातील हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, पराक्रम अशा सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ खरोखरच एक आदर्श माता होत्या.
स्वाती शेखर किर्तने
वसई जिल्हा
सौजन्य – समितिसंवाद, कोकणप्रांत