संत गुरुनानक जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
मध्ययुगीन भारतातील भक्ती सुधारकांमध्ये मोठा नावलौकिक मिळवणारे, संत कबीरांचे समकालीन तसेच आपल्या कार्याची दिशा आणि कार्य पध्दतीमध्ये क्रांतिकारी बदल करणारे संत म्हणजे गुरुनानक होत. गुरुनानक हे भक्ती चळवळीतील इतर सुधारकांमध्ये महत्त्वाचा दुवा होते.
इ. स. १४६९ मध्ये तलवंडी येथे तृप्तादेवी व कालुराम या माता-पित्याच्या पोटी नानकांचा जन्म झाला. नानक बालपणापासून व्यवहारी जगाच्या माया – मोहापासून दूर जाऊन विरक्त बनले. त्यांचा विवाह मुलराज खत्री यांची कन्या सुलक्षणी हिच्याशी झाला. त्यांना श्रीचंद आणि लक्ष्मीचंद अशी दोन मुले झाली. इ. स. १५९४ मध्ये त्यांना सुलतानपूर येथे ज्ञानप्राप्ती झाली. पुढे त्यांनी वायव्य भारतात भक्ती चळवळीस प्रारंभ केला. साधूसंतांचा सहवास नानकांना आवडत असे. त्यांनी स्वतः वैराग्य धारण केले. ते स्वतः पदे रचू लागले. “मर्दाना” नावाचा त्यांचा निष्ठावान हस्तक त्यांना रबाब वाद्यावर साथ करीत असे.
नानकांनी सारा भारत देश पायाखाली घातला. परदेशातही प्रवास केला होता. श्रीलंका आणि पश्चिमेला मक्का-मदिना येथे ते गेले होते. लोक त्यांच्याकडे आकर्षित होत होते. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. तीस वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी दूरवर प्रवास केला. नानकांनी भारताच्या कानाकोपऱ्यात आपल्या दिव्य उपासनेचा संदेश पोहचविला. आपल्या अनुयायांसाठी त्यांनी गृहस्थी जीवनाचा पुरस्कार केला होता. ज्याप्रमाणे गढूळ पाण्याने कमलपुष्प अजिबात मलिन होत नाही त्याप्रमाणे, मुक्ती मार्गावरील साधकांना संसार करणाऱ्या गृहस्थाप्रमाणे प्रामाणिक जीवन जगणे शक्य आहे. गुरुनानकांनी गृहस्थी जीवनाचा आदर स्थापन करताना स्वतः नांगर हाती धरला आणि शेती केली. नानकांनी विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेबरोबर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पाठपुरावा केला. तसेच जातीभेद व अस्पृश्यतेची भावना दूर करण्याच्या हेतूने आपल्या डेऱ्यात सहभोजनाची ‘लंगर प्रथा’ रूढ केली. जी लंगर प्रथा आजही गुरुद्वारांमध्ये चालू आहे.
गुरुनानकांनी आपल्या शिकवणुकीत सतत प्रचार करण्यासाठी गुरूपदाची स्थापना केली. ध्येयपूर्तीच्या मार्गावरील त्यांची ही सर्वाधिक मोठी कामगिरी होती. आजकाल आपण पाहतो की अगदी कोणत्याही क्षेत्रात मुलगा लायक असो किंवा नसो वडिलांच्या गादीचा वारस तोच असतो. मात्र, मध्ययुगीन काळात आध्यात्मिक गुणवत्तेच्या आधाराचा विचार करुन आपल्या गुरुपदाच्या गादीसाठी स्वतःच्या मुलांच्या ऐवजी आपल्या शिष्यांपैकी एक अंगददेव यांना आपल्यानंतर गुरुपद बहाल केले. अशाप्रकारे संत गुरुनानक हे गुणवत्तेच्या आधाराचा विचार करणारे क्रांतिकारक होते. इ. स. १५३८ ते १७०८ पर्यंत गुरुनानक यांच्या आध्यात्मिक पीठावर नऊ दिव्य पुरुषांनी विराजमान होऊन ते सुशोभित केले. हे क्रांतिकारी पाऊल एक स्वतंत्र धर्म म्हणून शीख धर्माच्या उदयाला कारणीभूत ठरले.
गुरुनानक हे एकेश्वरवादी होते. प्रेमाने व भक्तिभावाने ईश्वराचे भजन केल्यास मोक्ष मिळतो. जात-पात किंवा धर्म त्याच्या आड येत नाही; हीच त्यांचीही शिकवण होती. ईश्वरप्राप्तीसाठी शुद्ध चारित्र्य व गुरुचे मार्गदर्शन यावर त्यांचा कटाक्ष होता. त्याकाळातील हिंदू-मुस्लिम या प्रमुख दोन धर्मातील एकमेकांमधील कट्टरपणा दूर करून गुरुनानकांनी विशाल दृष्टी दिली. गुरुनानकांच्या विचारांनी भक्ती संप्रदायात विशाल दृष्टिकोन निर्माण झाला.
गुरुनानकांच्या विशाल दृष्टीची आजही गरज आहे.
– प्रशांत नारायण कुलकर्णी ,मनमाड (नाशिक )
संदर्भ – १. मध्ययुगीन भारत – प्रा. सतीश चंद्र
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे