राज्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वच भागांत या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीतील हरभरा, गहू, तूर आणि भाजीपाला पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. भात, बटाटा, ज्वारी, कांदा, मका, भाजीपाला, द्राक्ष यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व गारपिटीने 17 जिल्ह्यांमध्ये शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. पूर्व विदर्भ वगळता सर्वच जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
राज्यातील गारपिटीने आणि अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना तातडीने कशाप्रकारे मदत पोहचवता येईल यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी मुंबईत कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत .