महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. जोतिबांच्या आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिबांचे आजोबा शेरीबा गोन्हे माधवराव पेशव्यांच्या दरवारात सजावटीचे कामकाज करीत असत. यावर पेशव्यांनी त्यांना ३५ एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती, या फुलांच्या व्यवसायामुळे त्यांना फुले म्हणून ओळखले जाऊ लागले.
महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. जनतेने मुंबईतील समेत १८८८ मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती.
वयाच्या १२ व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला. जोतिबांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथील पंतोजींच्या मराठी शाळेत झाले. वयाच्या १४व्या वर्षी जोतिबांनी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तल्लख बुद्धीमुळे त्यांनी ५-६ वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू कन्नड, तामिळ, गुजराती भाषा येत होत्या.
३ऑगस्ट१८५४ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. सावित्रीबाई यांना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्यधापिका बनविले. त्यानंतर विविध ठिकाणी शाळा सुरू केल्या. १९५५ मध्ये प्रौढांसाठी देशातील पहिली ‘रात्र शाळा’ त्यांनी स्थापन केली. प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे महात्मा जोतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ञ होते.
२८ जानेवारी १८६३ रोजी पुणे येथील आपल्या घरी भारतातील पहिल्या बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. ८ मार्च १८६४ रोजी पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला.
समाज सुधारक म्हणून जोतिबा फुले यांचे उद्दिष्ट समाजात पसरलेल्या वाईट प्रथांपासून लोकांना मुक्त करणे हे होते. फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक कट्टरता, स्त्री-पुरुष समानता, स्त्री शिक्षण या कार्यासाठी वाहून घेतले. २८ नोव्हेंबर १८९० रोजी पुण्यात पक्षाघाताने निधन झाले. अशा या शिक्षणाच्या क्रांती सूर्याला शतशः नमन!
सौ.मधुरा मनोज रोझेकर
संदर्भ: गूगल
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र