भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी माहिती पत्रक व पोस्टरचे अनावरण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी आयोजकांकडून माहिती घेतली व महापरिनिर्वाण दिन गांभीर्यपूर्वक व्हावा यासाठी सूचना केल्या.
दिनांक १ व ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत देशभरातून तसेच राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून अनुयायी चैत्यभूमी येथे महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. या सर्व अनुयायांना प्रवास, निवास, वैद्यकीय सुविधा, पोलीस सहायता या व इतर गोष्टींची अधिक माहिती असावी या दृष्टीने माहिती पत्रक काढण्यात आले असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी यावेळी राज्यपालांना दिली.
महापरिनिर्वाण दिन अभिवादन कुठल्याही अनुचित घटनेशिवाय व्हावा या दृष्टीने माहिती पुस्तके लोकांना पाठवली जातील. तसेच पोस्टर राज्यातील विविध वस्त्यांमधील बुद्ध विहारांमध्ये लावली जातील, असे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला भदंत भन्ते डॉ. राहुल बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक त्रिशरण बुद्धपूजा पाठ घेण्यात आली.
यावेळी समितीचे महेंद्र साळवे, सिद्धार्थ कासारे, मयूर कांबळे, आदी उपस्थित होते.