अजित पवार गटाने दोन दिवसीय शिबिराचे आयोजन केले असून या शिबिरामध्ये अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या या शिबिरामध्ये आजी-माजी आमदार आणि खासदार राज्यातले सर्व जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे.आगामी निवडणुकांची तयारी देखील या शिबीरातून करण्यात येणार आहे.
या शिबिरादरम्यान आज संध्याकाळी अजित पवार राष्ट्रीय कार्यकारणी गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. एकीकडे निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष चिन्ह याबाबत सुनावणी सुरू असताना आज अजित पवार यांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तसेच अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून या बैठकीत सहभागी होणे हे महत्त्वाचे मानले जात आहे.यावेळी राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत .
याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे म्हणाले की,आगामी काळात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका, पक्ष , पक्षाचे संघटन मजबूत करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत ,राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या समारोपीय भाषणाने शिबिराची सांगता होणार आहे.