राज्याचे मंत्री छगन भुजबळ आज नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. मात्र मराठा आंदोलकांचा भुजबळांच्या या पाहणी दौऱ्याला जोरदार विरोध पाहायला मिळत आहे. लासलगावमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधी भुजबळांना फोन करून आमच्या बांधावर येऊ नका असे सांगण्यात आले होते त्यानंतर ज्या भागात ते गेले त्या भागात त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले.
राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा-ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भुजबळ मराठा आरक्षणाच्या विरोधात भाषणे करत आहेत. त्यामुळे मराठा समाजातील बांधवांचा रोष भुजबळांनी ओढवून घेतला आहे.
दरम्यान छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करणारी एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. यासह सोमठानदेश गावात भुजबळ गो बॅकच्या घोषणाही देण्यात आल्या. भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करणारे व्हिडीओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाले. आहेत. तसेच भुजबळांचा ताफा गावातून जाताच मराठा आंदोलकांनी गोमुत्र शिंपडून निषेध नोंदवला आहे.