आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आदिवासी विकास विभागासोबतच आदिवासी सेवक हा महत्वाचा दुवा आहे. सेवाभावी मनोवृत्तीतून आदिवासी सेवक व सेवा संस्था या दुर्लक्षित समाजास मदत करीत असतात. समाज उन्नतीसाठी या सेवकांना मिळणारे पुरस्कार हे त्यांच्यासाठी प्रेरक व ऊर्जादायी असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.
महाकवी कालिदास कलामंदिरात आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्थांना सन 2019 ते 2022 या चार वर्षाच्या राज्य पुरस्कारांचे आज मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते एका सोहळ्यात वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी, माजी आमदार उत्तम इंगळे, शिवराम झोले, एन.डी. गावित, संजय कुलकर्णी, संतोष ठुबे, सुदर्शन नगरे यांच्यासह पुरस्कारार्थींचे कुटुंबीय, नातेवाईक, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. गावित म्हणाले की, आदिवासी हा समाजाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्यांपासून इतरांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल. आपल्या हातून यापुढेही समाजाची सेवा घडत राहो व पुरस्कार्थींनी यापुढेही जोमाने काम करावे ही अपेक्षा मंत्री डॉ. गावित यांनी व्यक्त केली. ज्या आदिवासी बांधवांना स्वतःचे घर नाही त्यांना येत्या दोन वर्षात हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी सहावीपासूनच अॅकॅडमी सुरू करणार असून स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने त्यांची तयारी करून घेतली जाणार आहे. डिजिटल माध्यमातून शिक्षणासाठी शिक्षकांनाही आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. बिरसा मुंडा रस्ते जोड योजनेच्या माध्यमातून सर्व वाड्या, वस्त्या, पाडे बारमाही रस्त्याने जोडण्यात येतील. आदिवासी बांधवांसाठी वनोपज स्थानिक पातळीवर संकलित करून त्यावर प्रक्रिया करून
उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मदत करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया केलेले उत्पादने आदिवासी विकास विभाग खरेदी करण्यासाठी विक्री व्यवस्था उभारली जाणार आहे. आदिवासी बांधवांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी विभाग योजनाही राबवित आहेत, असेही मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्रीमती गुंडे यांनी पुरस्कारांची पार्श्वभूमी विशद केली. आदिवासी विकास विभाग राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. आदिवासी सेवकास 25 हजार तर संस्थेला 51 हजार रुपयांचा पुरस्कार दिला जातो. कोरोना कालावधीमुळे मागील चार वर्षाचे पुरस्कार एकत्रित देण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पुरस्कारार्थीचा परिचय देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कारार्थी डॉ. शशिकांत वाणी, नुरानी कुतुबअली, नामदेव नाडेकर, संतोष जनाठे, मधुकर आचार्य आदींनी मनोगत व्यक्त केले. अपर आयुक्त श्री. माळी यांनी आभार मानले.