सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) नगरपालिका क्षेत्रात अल्पसंख्याक समाजातील नोकरदार महिलांसाठी प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र महिला वसतिगृह बांधकामास निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती, अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा आज मंत्री सत्तार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार, उपसचिव आ. ना. भोंडवे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शेख व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री सत्तार म्हणाले, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित निगम, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने कर्ज घेण्यासाठी शासन हमी मर्यादेमध्ये 30 कोटी रुपये वरून 500 कोटी रुपये इतकी वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे भाग भांडवल 700 कोटी रुपये वरून वाढवून 1000 कोटी रुपये करण्याचे प्रस्तावित आहे. छत्रपती संभाजीनगर येथील आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम बांधण्याबाबतही योग्य तो प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री. सत्तार यांनी दिले.
सिल्लोड येथे ऊर्दू घर बांधण्यासाठी धर्मादाय संस्थेने शासनास दान केलेल्या जागेवर ऊर्दू घर बांधण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अनुदानात वाढ, तसेच पारंपरिक शिक्षणाबरोबर बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे मदरश्यांचे अनुदान 2 लाखावरुन 10 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मौलाना आझाद महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेची कर्ज मर्यादा 20 लाख रुपये करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.