सावळीविहीर (जि. अहमदनगर) येथे नवीन एमआयडीसी निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शेती महामंडळाच्या ५०२ एकर जमिनीवर रोजगार निर्मितीस चालना मिळणार असल्याची माहिती, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे असलेल्या सलग व समतल जमिनीचा सुयोग्य वापर करताना त्यावर औद्योगिक विकास क्षेत्र निर्मितीसह आणि रोजगार वाढीस चालना देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु. व सावळीविहीर खु. तसेच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे शेती महामंडळाच्या ५०२ एकर जमिनीचा सुयोग्य वापर होणार आहे.
नवीन एम.आय.डी.सी. उभारण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेले ठिकाण शिर्डी शहरापासून ५ किलोमीटर, समृद्ध महामार्गाच्या इंटरचेंजपासून केवळ ३ किलोमीटर व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १४ किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेमार्ग, रस्तेमार्ग तसेच हवाईमार्गाने देशभरातील सर्व प्रमुख शहरांना अत्यंत सुलभतेने जोडणारी औद्योगिक वसाहत म्हणून भविष्यात उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. सहकार पंढरी म्हणून नावलौकीक असलेले प्रवरानगर, साईबाबांची पावनभूमी असलेली शिर्डी तीर्थक्षेत्र, याचबरोबर आता उद्योग नगरी म्हणून परिसराचा नावलौकीक होण्यास हातभार मिळणार आहे.