मुंबई डबेवाला भवनच्या एक्सपिरियंस सेंटरचे भूमिपूजन
डबेवाल्यांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण करु
मुंबई, दि. ३० :- मुंबईचे वैभव म्हणून गेट वे ऑफ इंडिया, सीएसटी, वरळी सी लिंक याकडे पाहिले जात असले तरीही जिवंत माणसे हे खरे वैभव असते. डबेवाले हे मुंबईचे खरे वैभव आहे. त्यांचे असामान्य कार्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे डबेवाले जरी तंत्रज्ञान वापरत नसतील, तरी तंत्रज्ञानाचा वापर करुन जागतिक दर्जाचे डबेवाला एक्सपिरियंस सेंटर उभारू. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई डबेवाला भवनच्या एक्सपिरियन्स सेंटरच्या भूमिपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार श्रीकांत भारतीय, नगरसेविका सपना म्हात्रे, मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सोपानकाका मरे, नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके, मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, डबेवाले कंप्युटरपेक्षा हुशार आहेत. एकही चूक न होता ते अचूक काम करतात, म्हणून जगभरातील विद्यापीठे, नेते त्यांच्या व्यवस्थापन तंत्राचा अभ्यास करतात. जगभर या असामान्य कामाचे कौतुक केले जाते.
डबेवाल्यांपर्यंत पोहोचायला १०-१५ वर्ष उशीर झाला असला तरी आता डबेवाल्यांशी तयार झालेला ऋणानुबंध कायम राहील.
नैसर्गिक आपत्तीमध्ये डबेवाल्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत स्वखर्चातून मदत केली. डबेवाल्याना घरे मिळवून देण्यासही उशीर झाला, पण आता लवकरच त्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होईल. तिन्ही रेल्वे लाईनवर घरांची योजना राबविण्यात येईल.
महाराष्ट्र धर्म, स्वधर्म हा वारकरी संप्रदायामुळे ताठ मानेने उभा आहे. वारकरी वारी चुकवत नाही तसे डबेवाले रोज डबा पोहोचवून वारी करतात. त्यांच्या कामातुन रोज वारी घडते.
यावेळी आमदार श्रीकांत भारतीय प्रास्ताविक करतांना म्हणाले, मुंबईच्या जीवनात भागवत धर्माची पताका जिवंत ठेवण्याचे काम मुंबई डबेवाला यांनी केले आहे. विश्वासाहर्ता हा डबेवाला यांचा युनिक सेलिंग पॉईंट आहे.
मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सोपानकाका मरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, डबेवाला संघटनेला १२५ वर्षाची वैभवशाली परंपरा आहे. या संघटनेसाठी ५२ वर्ष कामकरीत असताना २५ वर्ष अध्यक्ष म्हणून राहिलो. डबेवाले घरापासून वंचित आहेत. ८० टक्के लोक भाड्याने राहतात. आमचे घराचे स्वप्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साकार करतील याची खात्री आहे असे ते म्हणाले.