बांधकामाची आधुनिक पद्धती लक्षात घेऊन मुंबई शहर आणि उपनगर येथील ७ हजार ५०० नाका कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी प्रथम टप्प्यात चार कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक कामगाराचा कौशल्य विमासुद्धा विभागामार्फत काढण्यात येणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेतून भारतीय मजदूर संघ आणि बांधकाम सेक्टर स्किल कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य प्रमाणिकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, भारतीय मजदूर संघाचे सचिव अनिल घुमने व नाका कामगार उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यामध्ये बांधकाम क्षेत्रात कुशल कामगारांची आवश्यकता व त्यामधील 55 टक्के त्रुट लक्षात घेता बांधकाम क्षेत्रामधील 47 टक्के कुशल कामगारांचा आजही अभाव समोर येतो. महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य असून, बांधकाम क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेऊन नाका कामगारांना कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांसाठी पूर्वज्ञान कौशल्य प्रमाणिकरण कार्यक्रम राबवला जात आहे त्याचा लाभ या कामगारांनी घ्यावा.
यावेळी नाका कामगारांना बांधकाम क्षेत्रात देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण विषयक साहित्याचे वाटप करण्यात आले.