राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात बैठक आयोजित केली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथील शिबिरात शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत मोठा दावा केला होता. तसेच त्यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले होते. त्यांच्या प्रत्येक गोप्यस्फोटांना आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे तसेच यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निशाणा साधला.
“अजित पवार जे काही बोलले त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच समजले. त्यांच्या बोलण्यात काही स्फोट होता का, वाव होता का या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल”, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.
तसेच भाजपसोबत जाण्याबाबत 2004 पासून चर्चा सुरु होती, असा दावा अजित पवार गटाने केला होता त्यावर उत्तर देताना पवारांनी सांगितले की , आमचे विचार भाजपच्या विचारांशी सुसंगत नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही लोकांकडे मते मागितली तेव्हा ती भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. ती एका विशिष्ट कार्यक्रमासाठी होती.
भाजपसोबत जाण्याच्या मागण्या झाल्या मात्र त्या संदर्भात चर्चा झाल्या नाहीत, असे मी म्हणत नाही. चर्चा झाली होती”, असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.