काळ्या मातीत मातीत तिफन चालत…
हे गीत आपण नेहमीच ऐकतो , गुणगुणतो….
माती इतकी भुसभुशीत होती की नुसतं नांगरणी करून पीक काढता येत होते.
सध्या पर्यावरणाचा परिणाम, बदलत्या जीवनशैलीचा निसर्गावर होणारा आघात, मातीचा होणारा ऱ्हास या गोष्टी लक्षात घेऊन जागतिक मृदा दिन साजरा करणे गरजेचे आहे असे वाटते .
इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्स ने 2002 मध्ये 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करावा असा प्रस्ताव मांडला.यानंतर 68 व्या संयुक्तराष्ट्र महासभेत 2013 ला अन्न व कृषी संघटना परिषदेने आग्रह धरला .शेवटी 5 डिसेंबर 2014 रोजी पहिला अधिकृत जागतिक मृदा दिवस म्हणून घोषित केला.
आपले अन्न हे जास्तीत जास्त जमिनीतून म्हणजे मातीतून उत्पन्न होते . ती जमीन सुपीक रहावी म्हणून वेळोवेळी तिचे परीक्षण करणे तर गरजेचे आहेच. आपली परंपरा आहे की आपण अश्विन नवरात्रात घट बसवतो तेंव्हा नऊ धान्य पेरतो . त्यात कळते की कुठल्या मातीत कोणते पीक घ्यावे. रासायनिक खतांचा वापर व कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे जमिनी क्षारपड झाल्या आहेत. त्यासाठी जमिनीचा पोत सुधारण्या साठी सेंद्रिय, कंपोस्ट खतांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात केला पाहिजे. कचरा व्यवस्थापन करताना ओल्या कचऱ्याचा उपयोग खत तयार करण्यासाठी व्हावा. प्लास्टिक बाटल्या, पिशव्या उघड्यावर टाकू नयेत .विकासासाठी वृक्षतोड झाली तर दुसरीकडे जास्त वृक्ष लागवड व संवर्धन होईल याची काळजी घ्यावी.
आता घराच्या अंगणात सुध्दा माती दिसत नाही. सगळीकडे सिमेंटीकरण झाले आहे.त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. पाणी मातीत मुरत नाही त्यामुळे जमिनीतील पाणीसाठा ही कमी होत चालला आहे.
या सर्व गोष्टी टाळून मातीचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जागतिक मृदा दिवस साजरा करूया. काळी माती,नीळ पाणी, हिरवं शिवार याचा अनुभव घेऊया.
मृदुल सुकृत काळे, वैदेही शाखा ,कराड
संदर्भ– गूगल
सौजन्य- समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र