राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला उद्याम्हणजे ७ डिसेंबर पासून ते २० डिसेंबर पर्यंत चालणार आहे. विविध विषयांवर सरकारला घेरण्यासाठी आक्रमक असलेले विरोधक व विधानसभा निवडणुकीतील विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या सत्ताधा-यांमुळे हे अधिवेशन गाजणार अशी चिन्हे आहेत. मराठा, धनगर आरक्षणाच्या मुद्यांबरोबरच अवकाळी पावसासाठी भरीव नुकसानभरपाई, शेतकरी कर्जमाफी, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, नाशिकचे ड्रग्ज प्रकरण आदी विषयांवर सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.
आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या परंपरेनुसार संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास सत्ता पक्षाकडून चहापानाचा कार्यक्रम होणार आहे. चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी होणार आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. अधिवेशन काळात नागपुरातील रस्त्यांवर तब्बल अकरा हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.