राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस शेतकरी प्रश्नावर गाजला. पहिल्याच दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड आक्रमक झाले, आणि विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी ठाण मांडले. संत्री, कापसाच्या बोंडांची माळ गळ्यात घालून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात केलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत द्यावी यासाठी काँग्रेसने स्थगन प्रस्ताव दिला होता; पण सरकारनं चर्चेपासून पळ काढला, असा आरोप काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला.
तर त्याला उत्तर देताना महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. शेतकऱ्यांना पूर्ण मदत करू, विरोधकांना चुकीची माहिती मिळत आहे, सरकार शेतकऱ्यांसोबत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अशातच प्रसिद्ध अभिनेता प्रसाद खांडेकरच्या एकदा येऊन तर बघा या मराठी चित्रपटाचा मुद्दा देखील विधानसभेत मांडण्यात आला. यावेळी प्रवीण दरेकर यांनी विधानसभेत सांगितले की, “एकदा येऊन तर बघा या चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नाहीयेत.” दरेकरांचा हा मुद्दा ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.