काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे झालेला भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला आहे.या वादग्रस्त वक्तव्यविरोधात भाजप नेते, कार्यकर्ते राज्यभरात रस्त्यावर उतरले आहेत. प्रियांक खर्गे यांच्याविरोधात संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी निदर्शने तसेच आंदोलने करण्यात येत आहेत. नाशिक, पुणे, छ. संभाजीगर, धुळे यासह राज्यात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून खर्गे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र कर्नाटक विधानसभेच्या दालनातून काढून टाकण्यात यावे असे अवमानजनक विधान खर्गे यांनी केले आहे . त्याचाच निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पुण्यात सारस बागेजवळील स्वातंत्रवीर सावरकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. प्रियांक खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आलेअसून तेथे गाढवाच्या गळ्यात खर्गे, तसेच राहूल गांधी यांचा फोटो लावून आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांच्याविरोधात जोरजोरात घोषणाही देण्यात आल्या.
नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाने खर्गे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी आंदोलकांनी खर्गे, राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही घोषणा दिल्या आहेत.