राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विधिमंडळातील उपस्थितीनंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान नवाब मलिक हे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. या भेटी दरम्यान राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित आहेत.
दरम्यान काल नवाब मलिक यांच्या हिवाळी अधिवेशनातल्या उपस्थिती नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहून नवाब मलिक यांच्याबाबत नाराजी बोलून दाखवली होती आणि त्यांच्या म्हणण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अनुमोदन दिले होते.
त्या नंतर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक आमच्याबरोबर आहेत, असे आम्हीं म्हणलेले नाही तसेच नवाब मलिक हे आमच्याबरोबर आहेत, अशी भूमिका यापूर्वी आम्ही कधीही मांडलेली नाही. असे म्हणत सावधपणाचा पवित्रा घेतला आहे. विरोधकांना कुठलाही मुद्दा नसल्याने ते आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या नवाब मलिक आणि अजित पवार यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाची विशेष नजर असणार आहे .