पा तोगनमेघालयचे जनजातीय क्रांतिकारक *’पा तोगन नेंग्मिंझा संगमा’*
पूर्वांचलातील मेघालय या निसर्गरम्य राज्याला शूर वीरांचीही मोठी परंपरा लाभलेली आहे. त्याच परंपरेमधील एक तेजस्वी नाव म्हणजे ‘पा तोगन नेंग्मिंझा संगमा’. मेघालयमधील गारो जनजातीचे नेता असलेले तोगन संगमा हे आपल्या वैयक्तिक युद्ध व शस्त्र कौशल्यासाठी संपूर्ण प्रदेशात प्रसिध्द होते. सन १८३५मध्ये, ब्रिटिश साम्राज्याने ईशान्य भारताला “पूर्वेचे स्कॉटलंड” असे संबोधून जैंतिया टेकड्यांचा ताबा घेतला. यामुळे क्रांतिकारक ऊ कियांग नांग्बाह यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी उठाव केला. तथापि, ब्रिटिशांनी जोरदार पलटवार केल्यामुळे ही चळवळ अयशस्वी झाली.
जैंतियानंतर गारो टेकड्यांच्या परिसरात देखील ब्रिटिशांनी वर्चस्व आघाडी उघडली. पुढील अनेक दशके ते गारो परिसरात पाय रोवायचा प्रयत्न करीत होते. १८६६ मध्ये ब्रिटिश अधिकारी ले. डब्ल्यूजे विल्यमसन याने अर्धा जिल्हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आणला. तरीदेखील, गारो टेकड्यांमधील काही अंतर्गत गावे पूर्णपणे स्वतंत्र राहिली. त्यामुळे १८७२ मध्ये संपूर्ण गारो टेकड्यांचा ताबा घेण्याचा निकराचा प्रयत्न ब्रिटिश करू लागले पण त्यांना स्थानिक जनजातीय लोकांकडून मोठा प्रतिकार झाला. विशेषत: गारो नेता पा तोगन नेंग्मिंझा संगमा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी शाही सैन्याला कडाडून विरोध केला. परंतु थोड्याच काळात, गारो टेकड्यांच्या प्रदेशात प्रवेश करून चिसोबिब्रा नावाच्या गावाजवळ इंग्रजांनी आपली पहिली छावणी उभी केली.
ही बातमी ऐकताच संगमांच्या लक्षात आले की, ब्रिटिश आता आपल्या भागात पाय रोवण्याचा, स्थिर होण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे, ब्रिटिशांना शक्य तितक्या लवकर इथून पळवून लावले पाहिजे. तेव्हा संगमा आणि त्यांच्या साथीदारांनी ब्रिटिश छावणीवर धाडसी हल्ल्याची योजना आखली. त्यासाठी आपल्या जनजातीय लोकांची एक सेना उभी केली. त्यांना संगमांनी स्वतः शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले. धनुष्यबाण, खंजीर, मिलम (लोखंडाच्या एकाच तुकड्यापासून बनवलेली दुधारी तलवार), सेलू (भाले) आणि स्पी (ढाल) यांसारख्या पारंपरिक शस्त्रांनी सज्ज गारो योद्ध्यांचे एक छोटेसे सैन्य संगमा यांच्या प्रेरणेने उभे राहिले. पुरेशी तयारी होताच सर्वांनी चिसोबिब्राकडे कूच केले.
काही काळ शत्रूच्या छावणीतील व्यवहार आणि हालचालींबद्दल अत्यंत सावधगिरीने माहिती मिळवल्यानंतर एका रात्री संगमांनी आपल्या सेनेसह ब्रिटिश छावणीवर अकस्मात हल्ला केला. गारो सेनेने अंधाराचा फायदा घेऊन समोर दिसणाऱ्या प्रत्येक इंग्रजी सैनिकाला मारायला सुरुवात केली. बेसावध असल्याने सुरुवातीला इंग्रजांची गडबड उडाली. शिवाय जरी गारो सैनिकांकडे अत्याधुनिक शस्त्रे नसली तरी शूर योद्धे म्हणून त्यांची पारंपारिक प्रतिष्ठा ब्रिटिश सैन्यात भीती निर्माण करण्यासाठी पुरेशी होती. परंतु, लवकरच ब्रिटिश सैनिक सावरले कारण त्यांच्याकडे ज्या प्रमाणात बंदुका वगैरे आधुनिक शस्त्रे होती त्याला तोंड देण्याइतपत शस्त्रास्त्रे संगमांच्या गारो सेनेकडे दुर्दैवाने नव्हतीच.
हिवाळ्यातील थंडीची रात्र होती आणि तोगन संगमा यांच्या नेतृत्वाखालील गारो योद्ध्यांनी इंग्रजांना पहाटेपर्यंत कडवी झुंज दिली. ‘का चालंग, का संगमा, का मारक’ आणि ‘है…है…कै…काय…रे टोकबो’ च्या ललकाऱ्यांनी सारा परिसर दणाणून गेला होता.
परंतु, संख्याबळ आणि शस्त्रास्त्रांच्या बाबतीत ब्रिटिश वरचढ असल्याने थोड्याच वेळात लढाईचा रंग पालटला. पाहता पाहता इंग्रजांची सरशी आणि गारो सेनेची पीछेहाट होऊ लागली. रात्रभर चाललेल्या या हातघाईच्या लढाईत संगमांच्या सेनेची खूप हानी झाली. अनेक गारो वीर बंदुकीच्या गोळ्या लागून लढता लढता कामी आले. असे असूनही, सर्व गारो योद्धे शेवटपर्यंत लढले. मृत्यू समोर दिसत असूनसुद्धा कोणीही माघार घेतली नाही. ब्रिटिश बंदुकांच्या गोळ्यांच्या प्राणघातक वर्षावात दुर्दैवाने पा तोगन संगमादेखील देशासाठी हुतात्मा झाले, तो दिवस होता १२ डिसेंबर १८७२!
आपल्या बांधवांचे आणि भूमीचे परकीय आक्रमाकांपासून रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पा तोगन संगमा यांच्या वीरवृत्तीला देशभक्तीला आणि अमरस्मृतीला शतशः नमन!
सौजन्य – विश्व संवाद केंद्र, पुणे