घडलेल्या घटनेची लोकसभा स्तरावर चौकशी होणार असल्याची घोषणा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे. ओम बिर्ला यांनी दिल्ली पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे.संसद सभागृहात सुरक्षा भंग आल्यानंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.सुरक्षेसाठी संसदेत अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
आज लोकसभेचं कामकाज सुरू असताना मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत हे दोघेजण लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. दरम्यान, अनेक खासदारांनी या दोन इसमांना घेरले . त्याचवेळी या दोघांनी त्यांच्या बूटातून स्मोक कॅन बाहेर काढले आणि सभागृहात धूर केला. सुरक्षा व्यवस्था भेदून हे दोघे सभागृहापर्यंत पोहोचल्याने संसदेतल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुढे आलेल्या माहितीनंतर हे एकूण ४ जण असल्याची माहिती समोर आली आहे.
यात महाराष्ट्रातील अमोल शिंदे नावाच्या तरुणाचाही समावेश असून तो लातूरचा असल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर तिघांची नावे सागर शर्मा, मनोरंजन आणि नीलम अशी आहेत. या सर्वानी म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावे पास तयार केले होते, अशी माहितीही समोर आली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माहिती दिली की, ज्या तरुणांनी गोंधळ घातला. त्यांना अटक करण्यात आली आहे. संसदेत आणि बाहेर जे घोषणाबाजी करत होते, त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुढे त्यांची पोलीस चौकशी करत आहे.